Thursday, October 22, 2026
spot_img
Home रत्नागिरी विश्‍वेश्वर घाटीत एसटी बसचा अपघात; तीन प्रवासी जखमी

विश्‍वेश्वर घाटीत एसटी बसचा अपघात; तीन प्रवासी जखमी

सिमेंटच्या पाइपला जोराची धडक; बसचे नुकसान, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी:- पावस ते रत्नागिरी मार्गावर भरधाव वेगात धावणारी एसटी सिटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या मोठ्या पाईपला धडकून झालेल्या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले असून, याप्रकरणी बस चालकाविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वेश्वर घाटीच्या पुढील चढावावर निष्काळजीपणा व बेदरकारपणे वाहन चालवून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसहून रत्नागिरीच्या दिशेने येत असलेली एसटी सिटी बस (क्रमांक MH 14 BT 4465) १२ ऑक्टोबर रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास विश्वेश्वर घाटीपुढील चढणीच्या रस्त्यावर आली असता हा अपघात घडला. चालक राजेश भगवानराव सोनकांबळे (वय ४५, मूळ रा. जयभीमनगर, नांदेड; सध्या रा. स्वीट अपार्टमेंट, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बस अतिशय हलगर्जीपणे चालवली. त्यामुळे बस रत्नागिरी न्यायालयासमोर डाव्या बाजूला मोरीच्या कामासाठी ठेवलेल्या सिमेंटच्या पाईपवर जोरात आदळली. या जोरदार धडकेत बसचे नुकसान झाले असून, बसमधील प्रवासी सीमा विश्वनाथ उबारे (वय ५७), गायत्री शैलेश शिंदे (वय ३०) आणि रामदास दत्ताराम शेलार (वय ६५, सर्व रा. वायंगणी उबारेवाडी, ता. जि. रत्नागिरी) हे तिघे जखमी झाले.

या अपघातानंतर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र मोहन पारकर यांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून चालक राजेश सोनकांबळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहर पोलीस याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.