खेड:- विवाहाशी संबंधित संकेतस्थळावर मुलींचे खोटे प्रोफाइल तयार करून त्याद्वारे लग्नाचे आमिष दाखवून विवाहासाठी इच्छुक तरुणांच्या फसवणूकप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित जोडप्याला १० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिले आहेत.
मूळ राजस्थानचा रहिवासी असलेल्या मनोज छोटूराम योगी (४१ रा. सध्या चंद्रेश व्हिला सोसायटी, लोढा हेवन, डोंबिवली पूर्व, निळजे ठाणे) याने विवाह जुळवणाऱ्या एका संकेतस्थळावर सुंदर मुलीचे फोटो वापरून खोटे प्रोफाइल तयार केले होते. या प्रोफाइलचा दुरुपयोग करून अविवाहित व विदुर तरुणांना लग्नाचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक सुरू केली होती, असा आरोप आहे.
त्याच्या या आमिषाला बळी पडून ७६ हजार रुपयांची फसवणूक झालेल्या खेड येथील एका विदुर तरुणाने पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारावर पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने संशयित मनोज योगी याला नौपाडा ठाणे येथून जेरबंद केले होते. या प्रकरणात त्याची साथीदार सोनल मनोज योगी ऊर्फ सोनल रामचंद्र केसरकर (३०, सध्या रा. देवळे ता. पोलादपूर जि. रायगड, मूळ रा. रूम नं. ००१, सी विंग, करूणा अपार्टमेंट विटावा ठाणे) हिला खेड पोलिसानी २४ रोजी पोलादपूर येथे अटक केली.
दोन्ही संशयित आरोपींना २७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. बुधवारी त्याची मुदत संपली असता न्यायालयाने त्यांना १० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील स्मिता कदम यांनी काम पाहिले.