Tuesday, September 15, 2026
spot_img
Home राजकीय वाढदिवसाचे औचित्य साधून पत्नीच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन

वाढदिवसाचे औचित्य साधून पत्नीच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन

भास्करशेठ जाधवांचा विश्वास ठाकरे गटावरच!

चिपळूण:- गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांनी मंगळवारी चिपळूण शहरात नव्याने सुशोभित केलेल्या आपल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पाडले. विशेष म्हणजे, या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या पत्नी सुवर्णाताई भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. मंगळवार हा सुवर्णाताईंचा वाढदिवस असल्याने त्या दिवसाचे औचित्य साधत कार्यालयाचे दालन खुले करण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून भास्करशेठ ठाकरे गटात राहतील का? की वेगळा निर्णय घेतील? नाराजी आहे का? अशा चर्चा राज्यभर गाजत होत्या. मात्र या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनात त्यांनी या सर्व चर्चांना एक सौम्य पण ठोस उत्तर, पक्षाच्या नावाचा फलक, सजावटीतूनच दिले.

कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना भास्करशेठ जाधव म्हणाले, “उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते माझ्याकडे आशेने पाहत आहेत. कार्यालयाच्या फलकावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाव स्पष्टपणे झळकत आहे. आतील संपूर्ण सजावट बघितल्यास मी पक्षावर नाराज आहे की नाही, हे कोणीही सहज ओळखू शकेल.”

त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, तर राजकीय जाणकारांनी हे विधान ठाकरे गटाशी असलेली त्यांची निष्ठा स्पष्ट करणारे म्हणून पाहिले.

कार्यक्रमास वाशिष्टी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, तालुकाप्रमुख पप्या चव्हाण, अर्बन बँकेचे चेअरमन मोहन मिरगल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी नगरसेवक समीर जाधव, प्रतापराव शिंदे, फैसल कासकर, उमेश खाताते, ऐश्वर्या घोसाळकर, बी. डी. शिंदे, बाळा अंबुर्ले, सचिन बाईत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जाधव कुटुंबीयांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती लक्षणीय होती.

या भव्य उद्घाटनामुळे चिपळूणच्या राजकीय वातावरणात चैतन्याचे वारं वाहू लागले असून, कार्यकर्त्यांमध्ये नव्याने ऊर्जा संचारली आहे. संपर्क कार्यालय हे केवळ कार्यालय नसून कार्यकर्त्यांशी संवादाचे ठिकाण आणि नेतृत्वाशी असलेल्या नात्याचे प्रतिबिंब असते, हेच भास्करशेठ जाधव यांनी या उद्घाटनातून अधोरेखित केलं आहे.