Thursday, July 2, 2026
spot_img
Home रत्नागिरी वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक

वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक

मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्याकडून तातडीने दखल, दोन दिवसांत कारवाईचे निर्देश

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत नादुरुस्त आणि धोकादायक बनली असून, रुग्णांसह येथील कर्मचाऱ्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, ‘खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थे’चे अध्यक्ष प्रथमेश गोपाळ गावणकर यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे मॅडम यांना लेखी निवेदन देऊन हे आरोग्य केंद्र तात्काळ दुसऱ्या सुरक्षित इमारतीत स्थलांतरित करण्याची मागणी केली.

संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रथमेश गावणकर यांनी दिलेल्या या निवेदनाची मुख्य कार्यकारी अधिकारी मा. वैदेही रानडे मॅडम यांनी तातडीने आणि गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी तत्काळ संबंधित आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी मा. श्री. आठल्ये साहेब यांना आपल्या दालनात बोलावून घेतले. या आरोग्य केंद्राची दुरवस्था आणि प्रशासनाचा दुर्लक्षितपणा योग्य नसल्याचे स्पष्ट शब्दांत नमूद करत, पुढील दोन दिवसांत या प्रकरणी गांभीर्याने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे कडक निर्देश त्यांनी दिले. प्रशासनाच्या या सकारात्मक आणि जलद भूमिकेबद्दल श्री. प्रथमेश गावणकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे मॅडम यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, यामुळे आता तरी या आरोग्य केंद्रातील कर्मचारी व उपचार घेणाऱ्या पेशंटना किमान दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

सन १९८६ मध्ये स्थापन झालेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राची गेल्या ४० वर्षांत कोणतीही विशेष देखभाल किंवा दुरुस्ती झालेली नाही. सद्यस्थितीत इमारतीचे पिलर पूर्णपणे नादुरुस्त झाले असून रूमचा स्लॅब कधीही कोसळू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात भिंतींमधून पाणी आत येत असून छप्परही उडून गेले आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे, विजेच्या वायरिंगमध्ये पाणी जात असल्याने गेल्या दोन वर्षांत काही कर्मचाऱ्यांना विजेचा शॉक लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. आरोग्य विभागाच्या या कमालीच्या दुर्लक्षामुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटमुळे (औद्योगिक विकास) या भागात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य केंद्रात दररोज १५० हून अधिक ओपीडी, १० हून अधिक आयपीडी रुग्ण आणि महिन्यातून एका प्रसूतीची नोंद होते. एवढा मोठा ताण असतानाही येथे अनेक कर्मचारी पदे रिक्त आहेत. कंत्राटी पद्धतीवरील दोन डॉक्टरांपैकी एका डॉक्टरने अनियमित वेतनामुळे कंटाळून राजीनामा दिला आहे. तसेच, येथे एक्स-रे आणि सोनोोग्राफीसारखी कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध नाही आणि औद्योगिक क्षेत्र असूनही तातडीच्या प्रसंगासाठी ॲम्बुलन्सची (रुग्णवाहिका) सुविधा उपलब्ध नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

परिसरातील नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा विचारात घेऊन संस्थेने प्रशासनासमोर दोन प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या. सुरक्षेच्या दृष्टीने हे प्राथमिक आरोग्य केंद्र तात्पुरत्या स्वरूपात तातडीने दुसऱ्या इमारतीत स्थलांतरित करावे आणि नवीन इमारतीचे काम त्वरित सुरू करावे. स्थानिक लोकसंख्या आणि औद्योगिक क्षेत्र लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान अद्ययावत वैद्यकीय यंत्रणा व सोयी-सुविधा तत्परतेने उभ्या कराव्यात.
प्रशासनाने दिलेल्या दोन दिवसांच्या मुदतीत जर योग्य ती कारवाई झाली नाही, तर समस्त नागरिकांना आपल्या आरोग्यविषयक मूलभूत अधिकारांसाठी घटनात्मक पद्धतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही ‘खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थे’तर्फे देण्यात आला आहे.