Sunday, May 10, 2026
spot_img
Home रत्नागिरी हातखंबा येथे दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल

हातखंबा येथे दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- बेदरकारपणे ट्रक चालवून आपल्या पुढील आठ वाहनांना धडक देत अपघात केला. तसेच या अपघातात एकाच्या मृत्यूस आणि 5 जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना बुधवार 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वा.सुमारास हातखंबा येथील देसाई हायस्कुलसमोरील उतारात घडली.

विजय शिवयोगी मडीवाल (23,रा.कोडलीवाड बेळगाव,कर्नाटक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात येथील पोलिस पाटील शर्वरी सनगरे (47, रा. सनगरेवाडी हातखंबा, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी विजय मडीवाल आपल्या ताब्यातील 16 चाकी ट्रक (केए-29-सी-1843) घेउन हातखंबा तिठा ते हातखंबा गावात जाणार्‍या रस्त्यावरुन जात होता. तेथील उतारात महामार्गाच्या नतुनीकरणाचे काम सुरु असल्याने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करत त्याने भरधाव वेगाने ट्रक चालवला. उतारात ट्रकवरील ताबा सूटल्याने त्याने आपल्या पुढील आणि समोरुन येणार्‍या वाहनांना धडक देत अपघात केला.
यात दुचाकी चालक शिवम गोताडचा जागीच मृत्यू झाला. तर निशांत सुरेश कळंबटे (21, रा.झरेवाडी, रत्नागिरी), कृष्णादेव भारत येडगे (36, रा.झरेवाडी, रत्नागिरी), सत्यविनायक सुरेश देसाई (48, रा.हातखंबा, रत्नागिरी), सुदेशकुमार शिवाजीराव चव्हाण (45, रा.लांजा, रत्नागिरी), समिर प्रकाश दळवी (40, रा.लांजा, रत्नागिरी) हे किरकोळ जखमी झाले.