लोणेरे तरुणी हत्या प्रकरणात लांजाचा मुख्य आरोपी ठाण्यातून जेरबंद

लांजा:- रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील तरुणीच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. ३८ वर्षीय आरोपी अनिस मोहम्मद खान मालदार याला शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ठाणे येथून ताब्यात घेण्यात आले.

रविवारी त्याला अलिबाग येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीचे मागील वर्षभरापासून पीडितेसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. प्रेमसंबंध असूनही त्याने तिला का संपवले याचे कारण समोर आले आहे.

२० एप्रिल रोजी लोणेरे येथील ‘ओमकार लॉज’मध्ये ही खळबळजनक घटना उघडकीस आली होती. आरोपीने तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. गोरेगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर रायगड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती.

आरोपी न सापडल्याने पीडितेच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी संताप व्यक्त केला होता. स्थानिकांचा रोष आणि घडलेली भयावह घटनेचा छडा यामुळे आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी जंग पछाडले होते. आरोपी अनिस हा मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील तळवडे मालदारवाडी येथील रहिवाशी आहे. त्याचा शोध घेण्यासाठी रायगड, रत्नागिरी, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई येथे पथके तैनात करण्यात आली होती.

या प्रकरणाशी संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मालदारने सांगितले की, अनिस मालदारचा आधी विवाह झाला होता. त्यानंतर त्याने पत्नीशी घटस्फोट घेतला. पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर गेल्या वर्षापासून त्याचे पीडितेशी ओळख झाली. या ओळखीतूनच त्यांचे प्रेमसंबंध झाले.

मागील वर्षभरापासून दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र, अनिशला पीडितेचे इतरही अनेकांशी संबंध असल्याचा संशय होता. या संशयातूनच १९ एप्रिल रोजी अंनिसने तिला बोलावून घेऊन तिची हत्या करण्याचा कट रचला आणि तिला निर्दयीपणे संपवले असल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपीचा शोध घेण्यासाठी रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबई परिसरात पोलिसांची पथके तैनात करण्यात आली होती. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी ठाण्यात असल्याचे समजले. पोलिसांनी तेथील लॉज आणि डॉरमेट्रींवर छापे टाकून अनिसला अटक केली. तपासादरम्यान या आरोपीचा जुना गुन्हेगारी इतिहासही समोर आला आहे. महाड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.