सांडेलावगण येथील दोन तरुणांनी सोडवला रोजगाराचा प्रश्न
रत्नागिरी:- लॉकडाऊन काळात सेंद्रीय पध्दतीने भाजी लागवड करत रत्नागिरी तालुक्यातील सांडेलावगण येथील दोन तरुणांनी रोजगाराचा प्रश्न सोडवला आहे. घराजवळील सहा ते सात गुंठे जमिनित ही परसबाग संकल्पना त्यांनी अस्तित्त्वात आणली आहे. श्रावण आणि गणपती उत्सवात सेंद्रीय भाजीला गावातच मागणी आहे.
कोरोनातील लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसांना व्यवसाय, रोजगार मिळवण्याचे आव्हान आहे. अनेक मुंबईकर चाकरमानीही गावी परतल्याने त्यात भर पडली आहे. सांडेलावगणमध्ये जग पुस्तकांचे ग्रंथालय आणि फिरत्या वाचनालय संकल्पना तरुणांनी हाती घेतली. त्यात कार्यरत असलेले राहुल बेनेरे, धनंजय पाष्टे यांच्यापुढे रोजगाराची अडचण होती. या संदर्भात गावातील ग्रंथालयाचे संचालक प्रसाद पाष्टे यांच्याशी संवाद साधला. त्यातून भाजी लागवड करण्याचे निश्चित झाले. धनंजय पाष्टे यांच्या पडक्या घराची जागा विनावापर होती. तसेच नवीन घराजवळही थोडीशी जागा होतीच. तेथे ठेवलेेले विविध प्रकारचे सामान इतरत्र ठेवण्यात आले. यामध्ये धनंजयचे वडील नथुराम पाष्टे यांचे सहकार्य मिळाले. परसबाग संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली.
भाजी लागवडीचा अनुभव या दोघांकडे नव्हता, पण इच्छाशक्ती होती. वाटद खंडाळा येथील भाजी व्यावसायिक राकेश वरवटकर व हातखंबा झरेवाडी येथील कृषी विद्यार्थी प्रतीक कळंबटे यांचे मार्गदर्शन घेतले. त्यासाठीची बियाणे, सेंद्रिय खते, फवारणीची साधने असा थोडा खर्च त्यांनी केला. पावसाळ्याच्या सुरुवातीला सेंद्रीय पध्दतीने लागवड सुरु केली. त्यात 6 ते 7 गुंठ्यांत पडवळ, कारले, भोपळा, भेंडी, दोडके, गवार ही पिके घेतली आहेत. दोन महिन्यांनी त्यावर फळं लागली आहेत. ही भाजी श्रावण महिन्याच्या तोंडावर तयार झाली असून गावांतच विक्रि सुरु झाली आहे.
परसबाग संकल्पना राबवण्यात पंचायत समिती सदस्या साक्षी रावणंग, संतोष रावणंग यांच्यासह जयवंत बेनेरे, परशुराम पाष्टे, सुरेश पाष्टे, वसंत पाष्टे आणि विनायक गावडे, आकाश सावरकर, तुषार मांडवकर, प्रणाली बैकर, सोनाली कुरतडकर, साक्षी कुरतडकर, अनिकेत बेनेरे, राजेश पाष्टे, मिथुन पाष्टे, सुयश बेनेरे, रोशन बेनेरे यांचे सहकार्य लाभले.









