राजापूर:- लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मुंबई-गोवा महामार्गावर दोन दिवसांपूर्वी महिलेला लुटण्याचा घडलेल्या घटनेप्रकरणी संशयिताचा शोध घेण्याच्यादृष्टीने पोलिसांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, संशयिताचे स्केच तयार केल्याचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी सांगितले.
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेच्या डोक्यात रॉड घालून तिचे दागिने लुटण्याचा प्रकार महामार्गावर दसऱ्याच्या दिवशी घडला होता. रश्मी प्रभाकर चव्हाण या कोदवली-तरळवाडी येथून सायंकाळी महामार्गावरील कोदवली थांब्यावर उभ्या होत्या. त्यांनी एका मोटारीला हात दाखवला. मोटारचालकाने त्यांना लिफ्ट दिली; मात्र, त्यानंतर त्याने पेडणेकर होम स्टॉपजवळील वळणावर चव्हाण यांच्या डोक्यात रॉड मारून जखमी केले व त्यांच्याकडील रोकड, सोन्याची बुगडी व मोबाईल हिसकावून घेतला तसेच चव्हाण यांना चालत्या गाडीतून रस्त्यावर ढकलून पलायन केले.