Saturday, May 23, 2026
spot_img
Home लांजा लांजात एसटीच्या धडकेत पादचारी जखमी

लांजात एसटीच्या धडकेत पादचारी जखमी

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावर लांजा एसटी स्टँडसमोर ३१ मे २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एसटी बसने धडक दिल्याने ६८ वर्षीय पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी बस चालकाविरुद्ध लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कणकवली एसटी डेपो येथील चालक अविनाश अशोक हारे (३९, मूळ रा. बौद्धवाडी, चिपळूण, मिरजोळी) हे रत्नागिरी ते कणकवली अशी एसटी बस (क्र. एमएच १४ बीटी २५०७) घेऊन जात होते. लांजा एसटी स्टँडमध्ये बस घेत असताना त्यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, हयगयीने आणि निष्काळजीपणे बस चालवली. यामुळे पादचारी महादेव गुणाजी कुळये (६८, रा. शिरवली, पलीकडचीवाडी, ता. लांजा) यांना बसने जोरदार धडक दिली. या अपघातात कुळये यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या आहेत.

लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र अर्जुन कांबळे (ब.नं. ११९८) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश अशोक हारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत.