मिरजोळेतील मुलीच्या खुनाचे कारण समोर
रत्नागिरी:- प्रेयसीने लग्नाचा हट्ट धरल्याने प्रियकराने दोन सहकार्याच्या मदतीने प्रेयसीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह आंबा घाटातील दरीत फेकून दिला. दि.21 रोजी मिरजोळे येथील हेमंत जितेंद्र मयेकर यांनी बहिण बेपत्ता असल्याची फिर्याद रत्नागिरी शहर पोलीसात दिली. याप्रकरणी खंडाळा येथील बार व्यावसायिक दुर्वास दर्शन पाटील (वय ३०.) यास पोलीसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आणि त्यानंतर पोलीस तपासात त्याने खून केल्याचे कबूल केले.
शनिवारी दोन वाजता सहकारी आरोपींना घेऊन रत्नागिरी व देवरूख पोलीसांचे पथक घाटात दाखल झाले. आंब्यातील अपघात मदत पथकातील पंधरा तरूणांना पोलीसांनी पाचारण करून दरीतील मृतदेहाचा शोध घेतला व पथकाने दरीत उतरण्यास वाट तयार करून घेतली.
तीन तासानंतर उपविभागीय पोलिस अधीक्षक निलेश माईनकर, विवेक पाटील मुख्य आरोपीस घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह काढण्यास सव्वा पाचला मदत पथक दरीत उतरू लागले. सायंकाळ होवू लागल्याने दरीत धुके दाटले होते. पावसाची रिपरिप चालूच होती. तीन दोरखंड गाडीला बांधून त्याच्या सहाय्याने सहा तरूण घसरच दरीत उतरले. साठ फूट खोल दरीत झाडीत मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला. वीस मिनिटांत मृतदेह प्लस्टिकमध्ये बंदिस्त करून रस्तावर आणला गेला.
फिर्यादी, आरोपी व साक्षिदार यांच्या समक्ष मृतदेहाची ओळख पटवली. अंगावरील गुलाबी नक्षीकाम ड्रेस व हातावरील टॅटूवरून भाऊ हेमंत याने भक्ती बहीणाची ओळख पटवली. साडेसहानंतर साखरपा येथे आरोग्य केंद्रात शवविच्छेदनास मृतदेह नेला.
बारा दिवसापूर्वीचा मृतदेह असल्याने चेहरा सडून कवटी शिल्लक राहीली होती. सतत पाऊस असल्याने दुर्गंधी पसरलेली नव्हती. आंबा घाटात अपघात असो की अन्य गुन्हेगारी घटना असो, आंबा गावातील मदत पथक सतर्क असते. पोलीस अधिकारी देखील येथील पथकाची मदत घेतात. मदत पथकातील विजय पाटील, दिनेश कांबळे, दिनेश गवरे, दिपक भोसले, सागर चाळके, व्दिग्वीज गुरव, शंकर डाकरे यांचेसह पंधरा तरूणांनी मृतदेह दरीतून वर घेण्यास योगदान दिले.
उपविभागीय पोलिस अधीक्षक निलेश माईनकर,विवेक पाटील, एल.सी.बी.पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, देवरूख पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, डी.वाय.एस.पी.सुरेश कदम, हवालदार सचिन कामेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
भक्ती व दुर्वास यांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गरोदर राहील्याने तीने लग्नाचा हट्ट धरला पण त्याने विरोध केला. प्रेयसी ऐकत नाही हे पाहता आपल्या जीवनातील अडथळा दूर करण्यासाठी तिचा खून करून तिचा मृतदेह रत्नागिरीपासून सत्तर किलोमीटरवरील गायमुख जवळील दरीत फेकून दिला. तिच्या खूनानंतर दोन दिवसांत त्याने दुसऱ्या मुलीशी साखरपुडा केल्याची संतापजनक बाब मयेकर कुटूबियांकडून समजली.
मित्राचा खून केल्याचा संशय
दुर्वास पाटील मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे.त्याच्या मालकीचे खंडाळा येथे बार व दारूचे दुकान आहे. दहा महिन्यांपूर्वी खंडाळा येथील तरूण बेपत्ता आहे. त्याचाही खून करून याच दरीत फेकल्याचे तपासात पुढे आले आहे. त्याचाही तपास करण्याचे ठरले होते पण धुके व अंधार पडू लागल्याने हा तपास पुढे ढकलण्यात आला.