रेल्वे स्थानकातून दागिने चोरणाऱ्याला अटक

संगमेश्वर:- संगमेश्वर रेल्वेस्थानकाच्या प्रतीक्षालयातून प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला संगमेश्वर पोलिसांनी वेषांतर करून शिताफीने अटक केली आहे. संतोष चंद्रकांत राणे (सध्या कांदिवली- मुंबई, मूळ मळगाव – सावंतवाडी) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

मार्चमध्ये सोन्याचांदीचे दागिने चोरल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध दोन गुन्हे संगमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले होते. तपासकार्य सुरू असताना रेल्वेमध्ये चोरी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष राणे हा चोरी करीत असल्याचे समजले. परंतु सदरचा आरोपी हा मोबाईल वापरत नसल्याने तसेच त्याचा कोणत्याही प्रकारचा ठावठिकाणा नसल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. म्हणून संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने सलग सहा रात्री प्रवाशांचा वेश धारण करून संगमेश्वर रेल्वेस्थानकाच्या प्रतीक्षालयामध्ये चोरट्याला अटक करण्यासाठी सापळा रचला होता.

३० रोजी संगमेश्वर रेल्वे स्थानक येथे पुन्हा सापळा लावला असता रात्री १ च्या सुमारास संगमेश्वर प्रतीक्षालयाबाहेरील बाकड्यावरुन राणे याला ताब्यात घेतले. त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली असून चोरलेले ४४ ग्रॅम वजनाचे सोने व ७ ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण रु. २ लाख ७० हजार किंमतीचा मुद्देमाल पनवेल, कल्याण, महाड येथून जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे, सी. टी. कांबळे, हेकाँ शिंदे, कामेरकर, मनवल, सासवे, कॉ. आव्हाड, घोलप, मस्कर, लोखंडे, पाईकराव यांनी संशयिताला अटक करण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.