आठही खलाशांना वाचवण्यात यश, मोठी दुर्घटना टळली
रत्नागिरी:- रत्नागिरीतील राजीवडा समुद्रात रविवारी सकाळी एक मोठा थरार पाहायला मिळाला. लाईट हाऊस परिसरात मच्छीमारी करून परतणाऱ्या ‘ओशियन पर्ल’ या बोटीला अचानक आलेल्या महाकाय लाटेने तडाखा दिल्याने बोट समुद्रात उलटली. या अपघातात बोटीवरील आठही मच्छीमार समुद्रात फेकले गेले. मात्र, मागून येणाऱ्या ‘अल सुरया’ बोटीवरील खलाशी आणि सागर रक्षक दलाच्या सदस्यांनी जीवाची पर्वा न करता देवदूतासारखे धावून येत आठही जणांना सुखरूप बाहेर काढले. यामुळे समुद्रात घडलेला मोठा अनर्थ टळला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. २०) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास राजीवडा येथील ‘ओशियन पर्ल’ ही मासेमारी छोटी नौका आठ खलाशांना घेऊन मच्छीमारीसाठी समुद्रात रवाना झाली होती. सकाळी मच्छीमारी आटोपून सकाळी ८:४५ वाजण्याच्या सुमारास ही नौका राजीवडा जेटीच्या दिशेने परत येत होती. नौका लाईट हाऊस समोर आली असताना अचानक समुद्रात एक प्रचंड लाट उसळली. या लाटेच्या तडाख्यामुळे नौकेचा समतोल पूर्णपणे बिघडला आणि काही क्षणांतच ‘ओशियन पर्ल’ समुद्रात उलटली. बोटीवरील साद सिकंदर हुसये (२१), मुहाफीस मुजकीर मुकादम (२२), अहमद सुलेमान सोलकर (३८), इम्तियाज मलिक मुजावर (२१), नासिर गफूर हुसये (६०), शोएब नासिर हुसये (३०), इमरान अन्वर डंगी (३५) आणि तौसीफ सुलेमान सोलकर (३५, सर्व रा. राजीवडा, ता. रत्नागिरी) हे आठही जण खोल समुद्रात फेकले गेले.
नौका उलटल्याचे दृश्य त्याच मार्गावरून मच्छीमारी करून परतणाऱ्या ‘अल सुरया’ या बोटीवरील खलाशांनी पाहिले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने आपली बोट दुर्घटनाग्रस्त भागाकडे वळवली. सागर रक्षक दलाच्या सदस्यांनी आणि खलाशांनी तात्काळ पाण्यात दोर व सहाय्यक साधने फेकून मदतकार्य सुरू केले. आपल्या प्राणाची पर्वा न करता खालीद इस्माईल होडेकर, अजमल शब्बीर हुनेरकर, कैफ खालीद होडेकर, खलील अली मजगावकर आणि यासीन महमूद पावसकर (सर्व रा. राजीवडा) यांनी एक-एक करून आठही मच्छीमारांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले आणि ‘अल सुरया’ बोटीवर घेतले.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी आणि राजीवडा किनाऱ्यावर भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. किनाऱ्यावर आणल्यानंतर सर्व खलाशांची विचारपूस करण्यात आली. आठही जण सुखरूप असून त्यांनी वैद्यकीय तपासणीची गरज नसल्याचे सांगितले.









