तिघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील राजिवडा परिसरात जुन्या वादाचा राग मनात धरून एका २३ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दापोली पोलिसांनी तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी फैजान रियाज फणसोपकर (वय २३) आणि संशयित आरोपी वासिम मुल्ला यांचा मुलगा अफान मुल्ला यांच्यात ७ फेब्रुवारी रोजी भांडण झाले होते. याच वादातून १० फेब्रुवारीच्या रात्री ९ वाजता, फैजान राजिवडा पुलावरून घरी जात असताना वासिम मुल्ला यांनी त्याला अडवून त्याची चेष्टा केली. फैजानने याला विरोध केला असता, आरोपीने त्याला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यावेळी मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला होता.
हा वाद तिथेच न थांबता, रात्री ११ वाजेच्या सुमारास फैजानच्या घराजवळ पुन्हा तणाव निर्माण झाला. आरोपी क्र. १ अरफात मोहम्मद शरीफ फणसोपकर याने फैजानच्या आईला उद्देशून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. फैजान तिथे पोहोचला असता, आरोपी क्र. २ इमरान अब्बास फणसोपकर याने त्याला घट्ट पकडून ठेवले. याचवेळी अरफातने हातातील लोखंडी रॉडने फैजानच्या डोक्यात प्रहार केला. या हल्ल्यात फैजान गंभीर जखमी झाला असून त्याचे कपडेही फाडण्यात आले.
या प्रकरणी फैजान फणसोपकर याने दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी पोलिसांनी अरफात मोहम्मद शरीफ फणसोपकर (वय २७), इमरान अब्बास फणसोपकर (वय ३८), वासिम मुल्ला (वय ४०) या तिन्ही संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









