राजापूर येथे शिंपल्यांची तस्करी करणार्‍या टेंपोसह चालक ताब्यात

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील साखर कोंभे येथे शिम्पल्यांची तस्करी करणारा टेम्पो पोलिसांनी सापळा रचत पकडला. साखर कोंभे येथून हा ट्रक कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता. या बाबतची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी टेंपोसह चालकाला ताब्यात घेतले.

05 फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. राजापूर पोलीस ठाणे येथे गोपनीय कामकाज करणारे पोलीस अंमलदार सचिन वीर यांना याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. राजापूर तालुक्यातील ‘साखर कोंभे या ठिकाणाहून शिंपल्यांची कच भरलेला एक आयशर टेम्पो गैरकायदा विनापरवाना वाहतूक करत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. माहिती मिळताच लागलीच राजापूर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे यांना याबाबत कळविण्यात आले. त्यांनी राजापूर पोलीस ठाणे हद्दी मधील हातिवले येथे या गैरकायदा विनापरवाना शिंपल्यांची कच वाहतूक करत असलेल्या आयशर टेम्पोला पकडण्याकरिता एक पथक नेमले.

हातिवले येथील मुंबई- गोवा महामार्गावर या पथकाला गस्त घालत असताना रात्री अकरा वाजण्याच्या दरम्याने हातिवले, जोशी पेट्रोलपंप समोरील महामार्गावर एक लाल रंगाचा आयशर टेम्पो येत असताना दिसला. या टेम्पोचा या पथकाला संशय आल्याने त्यांनी टेम्पो थांबविण्याचा इशारा केला व महामार्गाच्या एका बाजूला थांबवून टेम्पोच्या मागील हौदावर असलेली ताडपत्री वर करून पाहिली असता हौदामध्ये शिंपल्यांचा कच भरलेला दिसला.
या पथकाने टेम्पोवरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव (दत्ता बाळासाहेब राऊत वय 43 वर्षे रा. कागल बिरदेव वसाहत कागल, जि. कोल्हापूर) असे सांगितले व टेम्पो मधील मालाचे वजन 15 टन असल्याचे सांगितले. सदरच्या मालाबाबत टेम्पो चालकाकडे कोणताही खरेदी अगर वाहतुकीचा परवाना नसल्याने तो माल त्याने चोरुन आणल्याची खात्री या पथकाला झाली.

या गुन्ह्यामधील आरोपी टेम्पो चालक दत्ता बाळासाहेब राऊत याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरुद्ध राजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नं 14/2024 भा.द.वि.सं चे कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन आयशर टेम्पो क्रमांक (MH09-FL-5110) व 15 टन वजन असलेला खाडीतील शिंपल्यांचा कच हस्तगत करण्यात आला आहे.