राजापूर:- राजापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेरील बाजूस संशयास्पदरीत्या ट्रॉली बॅग घेऊन फिरणाऱ्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगेत जुन्या वापरातील महिलांचे कपडे आढळून आले असून, या मुद्देमालाबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ११ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास राजापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेरील बाजूस बंद हॉटेलच्या शेजारी घडली. सुधीर श्रीधर पोटले (वय ५५, रा. जांभवली पहिलीवाडी, ता. राजापूर) हा काळ्या रंगाच्या ट्रॉली बॅगेत जुने वापरातील महिलांचे कपडे घेऊन जात असताना रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेले होमगार्ड व रेल्वे पोलिसांना संशयास्पदरीत्या आढळून आला.
पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडील मुद्देमालाबाबत त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे सदर मालमत्ता कोठून तरी चोरी करून अथवा लबाडीने प्राप्त केली असावी, असा संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाई केली.
या कारवाईत एकूण ५५५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये विविध रंगांचे महिलांचे वनपीस, टॉप, पायजमे, ब्रा, निकर, जीन्स पँट, शॉर्ट टी-शर्ट तसेच २०० रुपये किमतीची काळ्या रंगाची चाकांसह व्हीआयपी ट्रॉली बॅग यांचा समावेश आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संग्राम कृष्णात नेमणूक, राजापूर पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली असून, १२ सप्टेंबर रोजी पहाटे ३.५२ वाजता गु.र.नं. २४५/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.









