रनप सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षांच्या कठोर सूचना
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा विविध नागरी समस्यांवरून चांगलीच वादळी ठरली. शहरातील कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन, विवाह नोंदणी दाखल्यासाठी नागरिकांची होणारी ससेहोलपट, अतिक्रमणे, होर्डिंग्सची मुदतवाढ आणि मोकाट गुरांचा उपद्रव यांसारख्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. येत्या १५ ऑगस्टपूर्वी शहरातील सर्व रस्ते व फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याचे कडक निर्देश नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी दिले आहेत.
सभा सुरू होताच शहरातील शाळा क्रमांक १, ६, १२, १०, १८ आणि १७ या शाळांमधील घटत्या पटसंख्येचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर बोलताना नगरसेवक राजू तोडणकर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून या शाळांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्याची सूचना मांडली. यावर उत्तर देताना नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी, या सर्व शाळांचा आणि परिसराचा सखोल अभ्यास करूनच शासन नियमानुसार योग्य तो अंतिम निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.
दरम्यान, विवाह नोंदणीच्या कामात नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा बंड्या साळवी, निमेश आणि सोहेल यांनी लावून धरला. एकाच कामासाठी लोकांना १०-१० वेळा फेऱ्या माराव्या लागतात आणि मेडिकल ऑफिसर कडून किरकोळ चुका काढून नागरिकांना वाईट वागणूक दिली जाते, असा गंभीर आरोप त्यांनी केला. यावर मुख्याधिकारी यांनी, नागरिकांची अडवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. तसेच सर्वसामान्यांना तात्काळ न्याय मिळण्यासाठी नगर परिषदेत ‘तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्यात आला असून या कक्षाची जबाबदारी बेहरे यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील वाढत्या अतिक्रमणांवरूनही सभेत जोरदार चर्चा झाली. केतन शेटे यांनी केवळ कोकणनगर भागातच अतिक्रमण कारवाई का केली जाते, उर्वरित शहरात कारवाई का होत नाही, असा सवाल करत प्रशासनाच्या पक्षपाती धोरणावर बोट ठेवले. तसेच मुदत संपलेल्या होर्डिंग्सना पुन्हा मुदतवाढ देऊ नये, अशी आक्रमक भूमिका निमेश यांनी घेतली. यावर नगराध्यक्षांनी स्पष्ट केले की, यापुढे एकाही बेकायदेशीर होर्डिंगला मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच फुटपाथवर उभ्या असलेल्या वाहनांवर व गाड्यांवर ८ दिवसांत कारवाई करून १५ ऑगस्टच्या आत सर्व मुख्य रस्ते मोकळे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
नगर परिषदेची नाहक बदनामी करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा देत, याशिवाय इतर नागरी समस्यांवर चर्चा करताना, माजगाव रोड येथील गाळ्यांच्या उर्वरित निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने फेरमूल्यांकनासाठी प्रस्ताव त्रिस्तरीय समितीकडे पाठवण्याचे निश्चित करण्यात आले. प्लास्टिक बंदी संदर्भात येत्या ८ दिवसांत व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात येईल आणि गणेशोत्सवापूर्वीच त्यांना कडक सूचना दिल्या जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले. मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी केवळ योग्य काळजी घेणाऱ्या संस्थांनाच काम दिले जाईल, तर कोट्यवधी रुपये खर्च करूनही कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने या संपूर्ण निर्बीजीकरण प्रकरणाचा सर्व्हे करण्याची मागणी राजन शेट्ये यांनी केली.
शेवटी, सोशल मीडियावर रोपांसंदर्भात व्हायरल झालेल्या व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना श्री. न्याती यांनी सांगितले की, ती रोपे केवळ सॅम्पलिंगसाठी लावली होती. पिशवी न काढता रोपे तशीच ठेवली असती तर झाडांचे नुकसान झाले असते; मात्र यापुढे फायनल रोपे लावताना पिशवी काढूनच लावली जातील. नगरसेवक व नागरिकांना विश्वासात घेऊनच पुढील कामे केली जातील, तसेच तिरंगा कलर बदलण्याबाबत नगरसेवकांसोबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.









