रत्नागिरी:- अलोरे शिरगाव पोलीस
ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या बहुचर्चित रवींद्र सुर्वे खून प्रकरणातील मुख्य आरोपी संजय विनायक सुर्वे याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा झटका दिला आहे. गुन्ह्याचे अत्यंत गंभीर स्वरूप, प्राणघातक शस्त्राचा झालेला वापर आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचे सबळ पुरावे विचारात घेत उच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.
सध्या या प्रकरणाची सुनावणी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू आहे. २४ ऑगस्ट २०२३ रोजी रवींद्र सुर्वे यांचा त्यांच्याच खोलीत रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला होता. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट २०२३ च्या पुरवणी जबाबात उघड झाले की, घटनेच्या रात्री आरोपी संजय सुर्वे, दुसरा आरोपी वसंत हिलाम आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मंगेश मोहिते हे संजय सुर्वे याच्या खोलीत मद्यप्राशन करत होते. दरम्यान, मोबाईल फोनच्या कारणावरून झालेल्या तीव्र वादातून संजय सुर्वे याने तलवारीने रवींद्र सुर्वे यांच्या डोक्यावर, कमरेवर आणि हातावर प्राणघातक वार केले, तर सह-आरोपीने लोखंडी पाईपने मारहाण केली. या घटनेनंतर २५ ऑगस्ट रोजी पोलिसांनी आरोपी संजय सुर्वे याला अटक केली होती.
चिपळूण सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या पोलीस जबाबात आणि दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबाबात विरोधाभास आहे, तसेच तपासात त्रुटी असल्याने आरोपीला जामीन मिळायला हवा.
याउलट, सरकारी वकिलांनी तीव्र विरोध दर्शवत न्यायालयात मांडले की, मृताचा मृतदेह आरोपीच्याच जागेत सापडला असून तलवारीने शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांवर भीषण वार करण्यात आले आहेत, त्यामुळे आरोपीला सोडणे योग्य ठरणार नाही.









