Wednesday, August 26, 2026
spot_img
Home रत्नागिरी रनप सभेत सफाई-उद्यान कामगारांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून गदारोळ

रनप सभेत सफाई-उद्यान कामगारांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून गदारोळ

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सभापती विजय खेडेकर आणि नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी सफाई व उद्यान विभाग कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा प्रकर्षाने मांडला. सर्पदंश, किटक दंशाने सफाई कामगार दगावू नयेत, उद्यान विभागाचे कामगार झाडावर चढून काम करताना सुरक्षित रहावेत यासाठी सुरक्षा उपकरणे पुरवण्याची मागणी केली. नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी शिल्पा सुर्वे यांनी ही मागणी मान्य करून तातडीने सुरक्षा सुविधा पुरवण्यात येतील. सुरक्षा साहित्याचा वापर करण्यासाठी सक्ती केली जाईल, असे उत्तरादाखल सांगितले. सभेसमोरील सर्व विषय सर्वानुमते मंजूर झाले.

रत्नागिरी नगर परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात सर्वसाधारण सभा झाली. सुमारे २५ दिवसांपूर्वी झाडी कापताना उद्यान विभागाचे कामगार काशिनाथ गोताड यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्याचबरोबर काही कामगार झाडे तोडताना, फांद्या छाटताना पडून जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर समाजकल्याण समिती सभापती विजय खेडेकर आणि नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या सांगत त्यांना गमबूट, हॅडग्लोज, हेल्मेट ही सुरक्षा साधने पुरवण्याची विनंती केली. सभागृहात विनंती करतानाच त्यांनी लेखी निवेदनही पिठासीन अधिकारी शिल्पा सुर्वे यांच्याकडे दिले. सर्पदंशाने मृत्यू झालेल्या कामगाराला अर्थसहाय्यासह विमा मिळवून देण्यास नगर परिषदेने पुढाकार घ्यावा. त्या कामगाराच्या वारसाला कंत्राटी कामगार म्हणून समाविष्ट करून घ्यावे अशी मागणीही खेडेकर दाम्पत्याकडून करण्यात आली. गणेशोत्सव तोंडावर आला आहे. अशावेळी घरगुती गॅस जोडणीसाठी खोदाई करण्यात आलेले रस्ते पूर्ववत करून घेण्याची मागणीही सभापती खेडेकर यांच्यासह सभापती निमेश नायर, नगरसेवक राजीव कीर, बंड्या साळवी, राजन शेट्ये यांनी केली. सर्वसाधारण सभेवेळी उपस्थित असलेल्या महानगर गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही मागणी मान्य केली.

सर्वसाधारण सभेला प्रारंभ होण्यापूर्वी पिठासीन अधिकाऱ्यांनी गणेशोत्सवापूर्वी शहरातील खड्डे बुजवण्यात येतील. बंद पथदिप सुरू करण्यात येतील. मोकाट गुरे, भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पकडलेली गुरे सांभाळण्यासाठी दोन गोशाळा पुढे आल्या आहेत. तर कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम हाती घेतले जात असल्याचे सांगितले.

बंद पथदिप, खड्डे व गणेशोत्सवाच्या इतर उपाययोजनांसंदर्भात संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याची सूचना बंड्या साळवी यांनी केली. नगरसेवक राजन शेट्ये यांनी शहरात ठिकठिकाणी वाहिन्या टाकण्यासाठी खोदून ठेवलेले रस्ते पूर्ववत करण्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. शहरात अनधिकृत टपऱ्या आणि फेरीवाल्यांवर कारवाई सुरू झाली आहे. ही कारवाई थांबवू नये. एकावर कारवाई आणि दुसऱ्याला अभय अशी कार्यपद्धती अवलंबू नये असे नगरसेवक राजू तोडणकर आणि नितीन जाधव यांनी सांगितले. रस्ता वाहनांसाठी आणि फुटपाथ पादचाऱ्यांसाही आहे. त्यामुळे कोणालाही सहानुभूती मिळणार नाही असे आश्वासन पिठासीन अधिकारी शिल्पा सुर्वे यांनी दिले.

शिवाजीनगर येथील बसस्टॉपला छत्रपती शिवाजी महाराज असे नाव देण्यात यावे अशी मागणी नगरसेवक अभिजीत दुडये यांनी केली. नगर बाल संरक्षण समितीवर नगरसेविका सुप्रिया रसाळ यांचे नाव सर्वानुमते निश्चित करून पाठवण्याचा ठराव करण्यात आला. भुईभाड्याने देण्यात आलेल्या गाळ्यांना, खोक्यांना मुदतवाढ देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या मुदतवाढीचा करार करताना रस्ता रूंदीकरण व इतर विकासाचे काम करताना संबंधीत गाळेधारकाला जागा ताब्यात द्यावी लागेल अशी अट घालण्याची सूचना करण्यात आली.

रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील नागरी पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करणे, नागरी बेघर निवारा शाश्वत राहण्यासाठी देखभाल व्यवस्थापन निधीची तरतूद करण्याच ठरावही मंजूर करण्यात आला. उपाध्यक्ष समिर तिवरेकर, नगरसेविका स्मितल पावसकर, नगरसेवक अमित विलणकर आदींनी विविध विषयांच्या चर्चेत भाग घेतला. सभेत अनेक विषयांवरील प्रश्नाला मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी उत्तरे दिली.

सभागृहात गायले सहा कडव्यांचे राष्ट्रगीत…

नवीन कायद्यानुसार वंदे मातरम हे सहा कडव्यांचे राष्ट्रगीत गायले गेले. यापूर्वी दोन कडवीच म्हटली जात होती. माजी उपनगराध्यक्ष राजेश सावंत, माजी नगरसेविका राजश्री शिवलकर, उद्यान विभागाचे कामगार काशिनाथ गोताड यांना श्रद्धांजली अर्पण करून दुखवट्याचा ठराव करण्यात आला.