Sunday, August 23, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरी शहरातील वृध्द महिलेची ८७ लाखांची सायबर फसवणूक

रत्नागिरी शहरातील वृध्द महिलेची ८७ लाखांची सायबर फसवणूक

दहशतवादाच्या कारवाईची भीती दाखवत घातला गंडा

रत्नागिरी:- दहशतवादाशी संबंधित तक्रारी दाखल असल्याचे सांगत पोलिसांकडून अटक होण्याची भीती दाखवून रत्नागिरी शहरातील ६५ वर्षीय महिलेची तब्बल ८७ लाख ४५ हजार ५४३ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत शिवनेरी, तेलीआळी, रत्नागिरी येथे ही घटना घडली. फिर्यादी मधुश्री विलास पुनसकर (वय ६५) यांना मोबाईलवरून अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला. त्यांनी आपली नावे निरज कुमार आणि प्रदीप जयस्वाल अशी सांगितली. तसेच आपण ‘मिनिस्ट्री ऑफ इंडिया’मधून बोलत असल्याचे भासवून फिर्यादी यांच्या आधारकार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाविरुद्ध दहशतवादाशी संबंधित अनेक तक्रारी दाखल असल्याचे सांगितले.

या प्रकरणामुळे पोलिसांकडून अटक होण्याची कारवाई होऊ शकते, अशी भीती संबंधितांनी फिर्यादीच्या मनात निर्माण केली. त्यानंतर या कथित प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी आर्थिक व्यवहारांची पडताळणी करावी लागेल, तसेच फिर्यादी आणि त्यांच्या पतीच्या नावावरील ठेवी मनी लॉन्ड्रिंगमधून घेतल्या आहेत किंवा नाहीत, याची तपासणी करून संबंधित निधी पुन्हा परत करण्यात येईल, असा खोटा विश्वास देण्यात आला.

या प्रकारे फिर्यादींचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेगवेगळ्या माध्यमातून तब्बल ८७,४५,५४३ रुपये उकळण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पनसकर यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक २८३/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(क), ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.१७ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

दहशतवाद, मनी लॉन्ड्रिंग, पोलिस कारवाई किंवा अटक यांसारख्या गंभीर बाबींची भीती दाखवून नागरिकांकडून पैसे उकळण्याच्या सायबर फसवणुकीच्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी अशा फोन कॉल्सपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून फोनवरून दबाव आणून आर्थिक रक्कम भरण्यास सांगितल्यास तातडीने संबंधित अधिकृत यंत्रणेशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

एका फोन कॉलने निर्माण केलेली भीती आणि त्यावर विश्वास ठेवून केलेला आर्थिक व्यवहार ८७ लाखांच्या फसवणुकीत बदलला असून, या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून सुरू आहे.