अंतर्गत रस्त्यांचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी ‘रवी इन्फ्रा’ कंपनीची मदत घ्यावी : आ. किरण सामंत
रत्नागिरी:- रत्नागिरी विमानतळाचे मुख्य बांधकाम ८० टक्के पूर्ण झाले असले तरी अंतर्गत रस्त्यांचे काम सध्या काहीसे संथ गतीने सुरू असून हे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी ठेकेदार पाटील यांनी ‘रवी इन्फ्रा’ कंपनीची मदत घ्यावी व रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे असे आमदार किरण सामंत यांनी म्हटले आहे .जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
रत्नागिरीतील प्रस्तावित हायटेक विमानतळाचे मुख्य काम ८० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. विमानतळावरील इलेक्ट्रिकल कामे आता पूर्णत्वाकडे आली असून, पायाभूत सुविधांना वेग आला आहे. या बैठकीत विमानतळाच्या कामाचा वेग वाढवण्यावर चर्चा झाली.
रत्नागिरीचे विमानतळ सर्व आधुनिक सुविधांनी सज्ज आणि पूर्णपणे ‘हायटेक’ केले जाणार आहे. या भव्य प्रकल्पाचे संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून शासन स्तरावरून यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
विमानतळाचे मुख्य बांधकाम ८० टक्के पूर्ण झाले असले तरी अंतर्गत रस्त्यांचे काम सध्या काहीसे संथ गतीने सुरू असल्याबद्दल आमदार सामंत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. हे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी ठेकेदार पाटील यांनी ‘रवी इन्फ्रा’ कंपनीची मदत घ्यावी व रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे असे आमदार किरण सामंत यांनी बैठकीत सांगितले.
या बैठकीला विमानतळ विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता मंगेश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, न्याती कंपनीचे अधिकारी आणि अंतर्गत रस्त्यांचे काम करणारे ठेकेदार पाटील उपस्थित होते.









