रत्नागिरी:- शहरातील राम आळी येथे मुख्य रस्त्याच्या मधोमध बसून वाहतुकीस जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, २५ जुलै रोजी संध्याकाळी ५:२७ वाजता या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राहुल विश्राम जाधव (पोहवा/८७७) यांनी फिर्याद दिली आहे. राज राजन नागले (वय २३ वर्षे, व्यवसाय मोलमजरी, रा. आडीवरे, सद्यस्थितीत रा. बेणगीवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राज राजन नागले हा राम आळी येथील मुख्य रस्त्याच्या मधोमध बसला होता. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांच्या आणि नागरिकांच्या वाहतुकीस प्रत्यक्ष अडथळा निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २४९/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.









