Thursday, May 7, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरी बांधखिंडीत दिवसाढवळ्या घरफोडी; नोकरीवर गेलेल्या महिलेचा फ्लॅट फोडला

रत्नागिरी बांधखिंडीत दिवसाढवळ्या घरफोडी; नोकरीवर गेलेल्या महिलेचा फ्लॅट फोडला

सोन्याचे दागिने व रोकड लंपास

रत्नागिरी:- भरदिवसा बंद फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना बांधखिंड परिसरात घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्मिता संतोष सुर्वे या बांधखिंड येथील शिवसृष्टी गृहनिर्माण संस्थेच्या वसुंधरा अपार्टमेंटमध्ये राहतात. सोमवारी सकाळी सुमारे सात वाजता त्या नोकरीसाठी फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. दुपारी सुमारे तीन वाजता त्या ड्युटीवरून घरी परतल्या असता फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

संशय आल्याने त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता बेडरूममधील कपाट उघडे व अस्ताव्यस्त अवस्थेत आढळले. अज्ञात चोरट्याने कपाट फोडून त्यातील रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.

घरफोडी झाल्याचे लक्षात येताच सुर्वे यांनी तत्काळ शेजारील फ्लॅटधारकांना बोलावून घेतले व घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

स्मिता संतोष सुर्वे यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून परिसरातील माहिती संकलन व पुढील तपास सुरू आहे.