रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात 2006 ते सन 2020 या कालावधीत दाखल झालेल्या 12 विविध गुन्ह्यातील 10.033 किलोग्राम ‘गांजा’ व 3.98 किलोग्राम ‘केटामाईन’ असा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने तळोजा, नवी मुंबई येथे नाश केला.
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य-मुंबई, यांनी एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्दे माल नाश करण्याकरिता सर्व पोलीस अधीक्षक, यांना निर्देश केले होते. त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ड्रग्ज डिस्पोजल समिती ची स्थापना करण्यात आलेली आहे. या ड्रग्ज डिस्पोजल समितीचे अध्यक्ष, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, हे असून या समितीच्या सदस्या ह्या अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड व श्रीमती राधिका फडके, पोलीस उपअधीक्षक, (मुख्यालय) अश्या आहेत.
या समितीने रत्नागिरीतल एन.डी.पी.एस. कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यातील मुद्दे माल नाश करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरीला दिले होते. त्यानुसार शाखेकडून सन 2006 ते सन 2020 या कालावधीत गुंगी कारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, 1985 या कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी एकूण 12 एन.डी.पी.एस. कायद्या अंतर्गत गुन्ह्यातील मुद्दे माल नाश करण्याबाबत न्यायालयाकडून आदेश प्राप्त करून घेण्यात आले व त्याप्रमाणे नमूद गुन्ह्यातील एन.डी.पी.एस. मुद्दे माल जाळण्याच्या पद्धतीने नाश करण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाकडे अर्ज करण्यात आलेला होता. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाकडून सदर गुन्ह्यातील मुद्दे माल हा तळोजा, नवी मुंबई येथे नाश करण्याकरिता मंजूरी देण्यात आलेली होती.
त्याप्रमाणे श्री. धनंजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, श्रीमती जयश्री गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी व श्रीमती राधिका फडके, पोलीस उपअधीक्षक, (मुख्यालय) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व पथकाने दिनांक 27/12/2024 रोजी एन.डी.पी.एस. कायद्या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण दाखल 12 विविध गुन्ह्यातील 10.033 किलोग्राम ‘गांजा’ व 3.98 किलोग्राम ‘केटामाईन’ असा मुद्दे माल सुरक्षितपणे तळोजा, नवी मुंबई या ठिकाणी घेऊन जाऊन मुद्दे माल जाळण्याच्या पद्धतीने यशस्वी रित्या नाश केलेला आहे.









