पाचल:- आधुनिक तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करत रत्नागिरी पोलीस दलाने एका हरवलेल्या मुलीचा यशस्वी शोध घेतला आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून विकसित झालेल्या “रेड्स” या एआय आधारित अॅपमुळे हा तपास अवघ्या काही दिवसांत पूर्ण झाला.
१२ जानेवारी रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एक मुलगी हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी पारंपारिक पद्धतींसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला.
मुलीचे छायाचित्र रेड्स (Ratnagiri Advanced Integrated Data System)अॅपमधील ‘मिसिंग पर्सन्स’ विभागात अपलोड करण्यात आले.
देव-दृष्टी प्रणालीच्या साहाय्याने त्या एका छायाचित्रावरून तब्बल १०८ वेगवेगळ्या एआय जनरेटेड प्रतिमा तयार करण्यात आल्या. यामुळे मुलीचा चेहरा वेगवेगळ्या कोनातून किंवा वेशभूषेत कसा दिसू शकतो, याचा अंदाज पोलिसांना आला.
या तांत्रिक विश्लेषणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित मुलगी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील व त्यांच्या पथकाने तातडीने इगतपुरी गाठून मुलीला सुखरूप ताब्यात घेतले. संबंधित मुलीस रत्नागिरीत आणून सुरक्षितपणे तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. रत्नागिरी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.









