रत्नागिरी:- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रत्नागिरी शहरातील जेल नाका परिसरात केलेल्या धडक कारवाईत, ब्राऊन हेरॉईन या प्रतिबंधित अमली पदार्थासह एका २१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी अमली पदार्थासह एक मोटारसायकल असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नुफेरअली खालीद तांडेल (वय: २१ वर्षे, गाजीमोहल्ला, वरचा वाडा (मशिदीजवळ), साखरी नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक जेल नाका परिसरात नियमित नाकाबंदी आणि गस्त घालत असताना, संशयित हालचाली आढळल्यामुळे पोलिसांनी नुफेरअली तांडेल याला रोखून त्याची झडती घेतली.
या झडतीदरम्यान त्याच्याकडे ४ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन हा अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी अमली पदार्थासह त्याच्या ताब्यातील मोटारसायकल जप्त करत एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईनंतर आरोपी तरुण आणि जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर व दंडात्मक कारवाईसाठी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदर यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पार पाडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, हेड कॉन्स्टेबल विजय आंबेकर, वैभव मोरे, गणेश सावंत आणि अतुल कांबळे यांचा सहभाग होता. रत्नागिरी शहरात अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी उचललेल्या या कठोर पावलामुळे ड्रग्स तस्करांचे धाबे दणाणले आहेत.









