Thursday, October 8, 2026
spot_img
Home क्रीडा रत्नागिरी जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटीक्स जिल्हा निवड चाचणी

रत्नागिरी जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटीक्स जिल्हा निवड चाचणी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा अॅथलेटीक्स असोसिएशनच्यावतीने रविवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी NIDJAM राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटीक्स जिल्हा निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतून निवडण्यात येणाऱ्या खेळाडूना थेट राष्ट्रिय स्पर्धा खेळण्याची संधी मिळणार आहे. NIDJAM राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटीक्स स्पर्धा १४ ते १६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ऑक्सन विद्यापीठ, कामकोले, हैद्राबाद येथे होणार आहे.

जिल्हा निवड चाचणी स्पर्धा एसव्हजेसीटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, डेरवण, चिपळूण येथे होणार आहे. १४ व १६ वर्षाखालील मुले व मुली या गटासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक पटकाविणाऱ्या खेळाडूना पदक व प्राविण्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या खेळाडूना थेट राज्य स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे.

१४ वर्षाखालील मुले व मुलींसाठी ट्रायथलॉन ए, (६० मी. धावणे, लांब उडी, उंच उडी), ट्रायथलॉन बी (६० मी. धावणे, लांब उडी, गोळाफेक), ट्रायथलॉन सी (६० मी. धावणे, ६०० मी धावणे, लांब उडी) हे क्रीडा प्रकार आहेत. १६ वर्षाखालील मुले व मुलींसाठी ६० मी. धावणे, ६०० मी. धावणे, ८० मी. हर्डल्स, लांब उडी, उंच उडी, गोळा, भालाफेक, पेंटॅथलॉन हे क्रीडा प्रकार असणार आहेत.

१४ वर्षाखालील गटात १७ नोव्हेंबर २०१२ ते १६ नोव्हेंबर २०१४ तर १६ वर्षाखालील गटात १७ नोव्हेंबर २०१० ते १६ नोव्हेंबर २०१२ या कालावधीत जन्मलेले खेळाडू सहभागी होऊ शकतात. खेळाडूंनी आपला प्रवेश www.ratnagiriathletics.in या वेबसाईटवर नोंदवायचा आहे. प्रवेश नोंदविण्याची अंतिम तारीख १६ ऑक्टोबर २०२६ आहे. स्पर्धा सकाळी ९ वाजता सुरु होईल, त्यापूर्वी खेळाडूंनी आपली उपस्थिती द्यावी.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, उपाध्यक्ष श्रीकांत पराडकर, सरचिटणीस संदीप तावडे यांनी केले आहे.