१ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी:- शहरातील आठवडा बाजाराच्या मागील बाजूस पाण्याच्या टाकीजवळ पोलिसांनी कारवाई करून हेरॉईनसदृश अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे ७ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ, त्याच्या पुड्या तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य आणि मोबाईल असा एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १८ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
शहर पोलिस परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक शासकीय वाहनातून गस्त घालत असताना माळनाका, साळवी स्टॉप, नाचणे रोड, एसटी स्टँड परिसरात पेट्रोलिंग करण्यात आले. त्यानंतर आठवडा बाजार परिसरात गस्त घालत असताना पाण्याच्या टाकीजवळ संशयास्पद स्थितीत शिव कुमार चौधरी ऊर्फ शिव बहादुर सोनार (वय ३२, सध्या रा. पांढरा समुद्र, मुरुगवाडा, रत्नागिरी; मूळ रा. साडेपानी, जिल्हा कैलाली, नेपाळ) हा आढळून आला. त्याच्याकडे तपासणी केली असता पारदर्शक प्लास्टिक पिशवीत उग्र वासाचा ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ आढळून आला.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्लास्टिक पिशवीसह सुमारे ७ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ आढळला. त्यापासून २४२ पुड्या तयार करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले असून, प्रत्येक पुडीची किंमत ५०० रुपये असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच अंमली पदार्थ ठेवण्यासाठी वापरलेली भगव्या रंगाची प्लास्टिक पिशवी, पुड्या बांधण्यासाठी वापरलेले २४२ कागदाचे तुकडे आणि १५ हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित अशोक कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५९/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(अ), २१(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दुर्गा जीत बहादुर (वय ३१, मूळ रा. वॉर्ड क्रमांक ४, घोडाघोडी, कैलाली, नेपाळ; सध्या रा. पांढरा समुद्र, मुरुगवाडा, रत्नागिरी) याचाही आरोपी म्हणून समावेश आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.









