रत्नागिरीत 63 पैकी 55 ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता येणार

ना. सामंत; गद्दारांना जनताच धडा शिकवणार 

रत्नागिरी:- कोणी कितीही प्रयत्न केले तरी पुन्हा एकदा या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्‍वास व्यक्त करत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील ६३ पैकी किमान ५५ ग्रामपंचायती शिवसेना ताब्यात घेईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेतील गद्दारांनाही निर्वाणीचा इशारा दिला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने काही ठिकाणी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन ६०० पैकी २२३ ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेचे निवडून आले असल्याचे ना. सामंत यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला तालुकाध्यक्ष बंड्या साळवी, उपजिल्हाप्रमुख तथा जि.प. सभापती बाबू म्हाप आदी उपस्थित होते.

यावेळी २० ग्रामपंचायती बिनविरोध शिवसेनेच्या ताब्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अनेक ठिकाणी सर्वाधिक उमेदवार शिवसेनेचे बिनविरोध झाल्याचे त्यांनी संागितले. त्यामध्ये संगमेश्‍वर, परचुरी ग्रामपंचायतीतील ११ सदस्य बिनविरोध, पिरंदवणे ७, मांजरे ४, बोंड्ये ५ सदस्य बिनविरोध झाले आहेत. यामध्ये डिंगणी, नावडी, लोवळे आणि कुरधुंदा आदी ठिकाणी निवडणूक प्रक्रिया होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

करबुडे जि.प. गटातील उक्षीमध्ये ७ बिनविरोध, राई १, चाफे, देऊड बिनविरोध, चवेमध्ये ५, खालगांव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. कोतवडे, ओरी, नेवरे या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. जांभरूण ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून खरवते ग्रामपंचायतदेखील बिनविरोध झाली आहे. गणपतीपुळेमध्ये ७ पैकी १ जागा बिनविरोध निवडून आल्याचे त्यांनी सांगितले. हरचेरी जि.प. गटात कुरतडे ९, झरेवाडी ५, चिंद्रवली ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. चांदेराई, सोमेश्‍वर, कर्ला आदी ठिकाणी निवडणूक प्रक्रिया होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हरचेरीमध्ये ११ पैकी ११ जागा शिवसेनेच्या बिनविरोध आल्याचे ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना संागितले. गोळप, भाट्ये, कोळंबे आदी ठिकाणीदेखील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पानवल ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. नाचणेमध्ये १७ पैकी ४ जागा शिवसेनेच्या बिनविरोध आल्या आहेत. कशेळीत ७ पैकी २, कापडगांव ९, हातखंबा ११ पैकी ७, खानू ७, पाली ११ पैकी १० जागा बिनविरोध आल्या आहेत. ११ वी जागादेखील शिवसेनेची निवडून येईल, असे ना. सामंतांनी सांगितले.

तालुक्यातील काळबादेवी, सडामिर्‍या, मिर्‍या, कोतवडे, राई आणि डोर्ले आदी ग्रामपंचायतींबाबत ना. सामंत यांनी सावध प्रतिक्रिया दिली. सडामिर्‍या ग्रामपंचायतीत काटे की टक्कर होत असली तरी ही ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात येईल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर मिर्‍या परिसरात बाळ माने यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे अटीतटीची लढत होईल, असेदेखील ते म्हणाले.