रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सीएनजी इंधनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, वाढत्या मागणीमुळे वाहनचालकांना भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील रत्नागिरी शहर, चिपळूण, राजापूर आणि खेड-लोटे अशा प्रमुख ठिकाणच्या पंपांवर वाहनांच्या अर्धा-अर्धा किलोमीटर लांब रांगा लागल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. इंधनासाठी तासंतास ताटकळत उभे राहावे लागत असल्याने वाहनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने कोकणात पर्यटकांची मोठी मांदियाळी आहे. तसेच मुंबई-पुण्याहून आपल्या गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. बहुतांश खाजगी वाहने सीएनजीवर आधारित असल्याने पंपांवरील यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. रत्नागिरी शहरातील पंपांवरील रांगा थेट मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचल्या असून, स्वतःचा नंबर येण्यासाठी वाहनचालकांना किमान २ ते ३ तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
सीएनजीच्या या टंचाईचा सर्वाधिक फटका स्थानिक रिक्षा चालकांना बसला आहे. रत्नागिरीतील बहुतांश सार्वजनिक वाहतूक आता सीएनजीवर अवलंबून आहे. इंधन भरण्यासाठीच दिवसातील महत्त्वाचे २-३ तास वाया जात असल्याने रिक्षांच्या फेऱ्या कमी होत आहेत. “गॅससाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने दिवसाचे उत्पन्न निम्म्यावर आले आहे, कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा?” असा आर्त सवाल रिक्षा चालक विचारत आहेत. या परिस्थितीमुळे रिक्षा व्यावसायिकांच्या आर्थिक गणिताचे पूर्णपणे कंबरडे मोडले आहे.
जिल्ह्यात सीएनजी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असली, तरी त्या तुलनेत पंपांची संख्या अत्यंत तोकडी आहे. अनेकदा गॅसचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने पंप चालक ‘नो स्टॉक’चे फलक लावतात, ज्यामुळे उरलेल्या पंपांवर अधिकच गर्दी उसळते. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन जिल्ह्यात सीएनजी पंपांची संख्या वाढवावी आणि पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरत आहे. ही समस्या लवकर न सुटल्यास येणाऱ्या काळात वाहनचालक आणि रिक्षा संघटना आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.









