Wednesday, November 11, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीत पहाटे भीषण अग्नितांडव; ‘महालक्ष्मी मिनी मॉल’ आगीत भस्मसात

रत्नागिरीत पहाटे भीषण अग्नितांडव; ‘महालक्ष्मी मिनी मॉल’ आगीत भस्मसात

के. सी. जैन नगर परिसरातील घटना; अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

रत्नागिरी:- शहरातील के. सी. जैन नगर येथील ‘महालक्ष्मी मिनी मॉल’मध्ये आज बुधवारी पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या आगीत मॉलचे अतोनात नुकसान झाले असून लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
आज पहाटेच्या वेळी मॉलच्या इमारतीमधून अचानक मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. स्थानिक नागरिकांच्या ही गोष्ट निदर्शनास येताच त्यांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी पाणी फवारणी आणि शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मॉलमध्ये प्लास्टिक आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीने अवघ्या काही वेळातच रौद्ररुप धारण केले. पहाटे लागलेली ही आग सकाळी उशिरापर्यंत पूर्णपणे आटोक्यात आलेली नव्हती.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. सुदैवाने ही घटना पहाटेच्या वेळी घडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. घटनास्थळी स्थानिक पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी दाखल झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.