सुदैवाने जीवितहानी टळली
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने जनजीवन विस्कळीत केले असतानाच, आता या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका रत्नागिरी रेल्वे स्थानकाला बसला आहे. नुकत्याच कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणातील छताचा काही भाग अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना ५ जुलै रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. सुदैवाने, वेळीच सावध झाल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
पावसाचा जोर आणि सोसाट्याचा वारा सुरू असताना अचानक स्थानकाचे छत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. या दुर्घटनेत रेल्वे स्थानकाचा रिक्षा स्टँड परिसर पूर्णपणे अंधारात बुडाला होता. छताचा भाग कोसळत असल्याचे लक्षात येताच, तिथे आसऱ्याला थांबलेल्या प्रवाशांनी आणि नागरिकांनी तातडीने पळ काढल्याने सर्वांचे प्राण वाचले.
ही घटना रात्री उशिरा घडल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वर्दळ कमी होती. मात्र, जर ही दुर्घटना दिवसा घडली असती, तर स्थानकावरील प्रवाशांची, रिक्षाचालकांची आणि सामान्यांची प्रचंड गर्दी लक्षात घेता भीषण जीवितहानी झाली असती, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण अलीकडेच कोट्यवधी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आले होते. मात्र, पहिल्याच मोठ्या पावसात छताचा भाग कोसळल्यामुळे या नूतनीकरणाच्या कामाच्या दर्जाबद्दल आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात असून, संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.









