Monday, August 31, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा उद्या भव्य मूक मोर्चा

रत्नागिरीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा उद्या भव्य मूक मोर्चा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या प्रमुख मागण्यांसाठी उद्या, मंगळवार दिनांक १ सप्टेंबर रोजी रत्नागिरीत भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे कर्तव्यावर असताना ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेतील दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी आणि खटला जलदगती न्यायालयात चालवावा, ही या मोर्चाची मुख्य मागणी आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करून वर्षातून १० ते १२ ग्रामसभांऐवजी केवळ एकच आर्थिक नियोजन व आढावा ग्रामसभा ठेवण्याची कायदेशीर तरतूद करावी. ग्रामसभेत बाहेरच्या व्यक्तींकडून सोशल मीडियासाठी केल्या जाणाऱ्या अनाधिकृत व्हिडिओ रेकॉर्डिंगवर कायदेशीर बंदी घालावी. संवेदनशील आणि मोठ्या ग्रामपंचायतींच्या बैठकांकरिता प्रशासनाकडून सक्तीने व विनामूल्य पोलीस बंदोबस्त पुरवावा. कृषी, आरोग्य आणि समाजकल्याण यांसारख्या इतर विभागांच्या योजनांची संपूर्ण प्रशासकीय व आयोजनाची जबाबदारी संबंधित विभागांवरच सोपवावी. वैयक्तिक लाभाच्या योजनांचे लाभार्थी ग्रामसभेत निवडण्याऐवजी तालुका किंवा पंचायत समिती स्तरावर पारदर्शकपणे अंतिम करावेत.
​ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि न्याय हक्कांसाठी या मूक मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन युनियनच्या जिल्हा शाखेकडून करण्यात आले आहे. 1 सप्टेंबर रोजी ११ वाजता जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी असा मूक मोर्चा निघेल अशी माहिती युनियनचे
जिल्हाध्यक्ष सुरेंद्र महाडीक व
जिल्हा सरचिटणीस संजय दळवी यांनी दिली आहे.