Saturday, June 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरीतील दोन सराईत ड्रग्ज तस्करांवर तडीपारीची कारवाई

रत्नागिरीतील दोन सराईत ड्रग्ज तस्करांवर तडीपारीची कारवाई

रत्नागिरी:- जिल्ह्यात अंमली पदार्थ (ड्रग्ज) विक्री आणि गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. रत्नागिरी शहरात ड्रग्जचे जाळे पसरवणाऱ्या आणि तरुणाईला विळख्यात ओढणाऱ्या दोन सराईत ड्रग्ज तस्करांवर प्रशासनाने तडीपारीचा मोठा हातोडा मारला आहे. उपविभागीय दंडाधिकारी जीवन देसाई यांनी या दोघांना रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूर अशा तब्बल चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार (तडीपार) करण्याचे आदेश दिले आहेत. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील ड्रग्ज माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

​मोहम्मद ताहिर इब्राहिम मस्तान (रा. वरचा मोहल्ला, मिरकरवाडा, रत्नागिरी) आणि झहीर मेहमुद काझी (रा. गवळीवाडा, रत्नागिरी) अशी तडीपार करण्यात आलेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांची नावे आहेत. या दोघांवरही अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (एनडीपीएस) गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवाया आणि समाजातील उपद्रव लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर यांनी या दोघांच्या तडीपारीचा सविस्तर प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. दंडाधिकारी जीवन देसाई यांनी दोघांनाही तत्काळ चार जिल्ह्यांमधून हद्दपारीचे आदेश दिले. पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात पुकारलेल्या या मोहीमेमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. शहरातील मिरकरवाडा आणि गवळीवाडा यासारख्या संवेदनशील भागातून या गुंडांना हुसकावून लावल्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य वाढले आहे. येत्या काळातही ही धडक मोहीम अशीच सुरू राहणार आहे.