Friday, October 2, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीतील थ्रीडी शो, शिवसृष्टी प्रकल्प ठरले तोट्याचा सौदा

रत्नागिरीतील थ्रीडी शो, शिवसृष्टी प्रकल्प ठरले तोट्याचा सौदा

अवाच्यासव्वा वीजबिलांमुळे नगरपालिकेची तिजोरी रिकामी

रत्नागिरी:- पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने उभारलेले नावीन्यपूर्ण पर्यटन प्रकल्प आता पालिकेसाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरत आहेत. हे उपक्रम पालिकेच्या तिजोरीवर ताण आणत आहेत. पर्यटनातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा वीज बिलाचा खर्च अधिक असल्याने थ्रीडी मल्टिमीडिया शो आणि शिवसृष्टी हे प्रकल्प तोट्याचा सौदा ठरत आहेत.

अत्याधुनिक मल्टिमीडिया ‘थ्रीडी शो’ आणि ‘शिवसृष्टी’ प्रकल्प तोट्यात चालले आहेत. पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार थ्रीडी शोमधून गेल्या २० महिन्यांमध्ये पालिकेच्या तिजोरीत अवघे ८ लाख रुपये जमा झाले आहेत. प्रकल्पाच्या व्यवस्थापन आणि देखभालीवर ९ लाख रुपयांचा चुराडा झाला आहे. शो पूर्ण क्षमतेने सुरू असताना दरमहा दीड ते दोन लाख रुपये आणि शो बंद किंवा कमी प्रमाणात सुरू असतानाही पालिकेला सुमारे १ लाख रुपयांचे वीज बिल भरावे लागत आहे.

सध्या रत्नागिरी नगरपालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. कर्मचाऱ्यांचे थकीत पगार, शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता यांसारख्या मूलभूत नागरी सुविधा पुरवणे आणि कंत्राटदारांची देणी चुकवणे यासाठी प्रशासनाला रोज तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा बिकट काळात विजेचे अव्वाच्यासव्वा बिल भरणे पालिकेच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

प्रकल्प कायमस्वरूपी तोट्यात चालवण्याऐवजी तिकीटदरांचे पुनर्नियोजन करणे किंवा ते सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर चालवण्यास देणे यांसारखे ठोस व धाडसी निर्णय पालिका प्रशासन कधी घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे.