मूर येथे प्राैढावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

राजापूर:- बिबट्याच्या हल्ल्यातून कुत्र्याला वाचविण्यासाठी गेलेल्या प्राैढावर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार राजापूर तालुक्यातील मूर येथे बुधवारी (दि. १८) रात्री घडली. या हल्ल्यात रवींद्र सहदेव भांबाडे (वय ४५) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर रायपाटण ग्रामीण रुग्णालयात उपचार करून साेडण्यात आले.

रवींद्र भांबाडे यांची पत्नी व मुले मुंबईला राहत असून, ते कोळंब तिठा येथे एकटेच राहतात. त्यांनी स्वत:च्या रक्षणासाठी कुत्रे पाळले आहेत. त्यांच्या घराजवळच जंगलमय भाग असल्याने बुधवारी रात्री कुत्र्याच्या वासाने बिबट्या घराजवळ आला हाेता. त्याच्या वासाने कुत्रे भुंकू लागले. कुत्र्यांच्या आवाजाने भांबाडे यांनी घराचा दरवाजा उघडला आणि बिबट्याने थेट घरामध्ये घुसून कुत्र्यावर झडप घातली.

बिबट्या घरात घुसताच भांबडे यांना काही सुचेनासे झाले. त्यांनी कुत्र्याला वाचविण्यासाठी घरातील मिळेल ती वस्तू घेऊन बिबट्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यामुळे बिबट्याने कुत्र्याला सोडले आणि भांबडे यांच्यावर हल्ला केला.

बिबट्याच्या हल्ल्यानंतर भांबाडे यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. या आवाजाने आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्यांच्या घराकडे धाव घेऊन भांबाडे यांना साेडविण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी जाेरदार आरडाओरडा करताच बिबट्याने भांबाडे यांना सोडून बाजूच्या जंगलात धूम ठाेकली.

बिबट्याच्या हल्ल्यात भांबाडे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले हाेते. त्यांच्यावर उपचार करून घरी साेडण्यात आले आहे.

परिसरात भीतीचे वातावरण

दरम्यान, या घटनेने मूर, वाळवड, कार्जिडा, कोळंब, तळवडे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या घटनेची दखल घेऊन बिबट्याचा बंदाेबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.