Sunday, August 2, 2026
spot_img
Home दापोली मुरुड बीचवर स्टंटबाजी पडली महागात

मुरुड बीचवर स्टंटबाजी पडली महागात

धोकादायक पद्धतीने कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

दापोली:- दापोलीतील मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षिततेचा विचार न करता भरधाव वेगात कार चालवून इतरांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या अज्ञात चारचाकी चालकावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ८ जून रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ८ जून रोजी सकाळी मुरुड समुद्रकिनारी एक पांढऱ्या रंगाची चारचाकी ‘अर्टिगा’ (गाडी क्र. MH-42-BJ-4746) भरधाव वेगात वाळूवर चालवली जात होती. समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक उपस्थित असतात. अशा सार्वजनिक ठिकाणी अत्यंत धोकादायक पद्धतीने आणि भरधाव वेगाने गाडी चालवल्यामुळे पर्यटकांना दुखापत होण्याचा किंवा मोठी दुर्घटना घडण्याचा संभव होता. ही बाब पोलीस कर्मचारी दिलीप बाळकृष्ण नवाले यांच्या निदर्शनास आली.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल दिलीप नवाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, दापोली पोलिसांनी ९ जून रोजी दुपारी ३.३६ वाजता गुन्हा दाखल केला. आरोपी चालकावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१, १२५, मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ आणि भारतीय दंड संहितेच्या कलम २७९, ३३६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
​समुद्रकिनारे हे पर्यटकांसाठी फिरण्याचे ठिकाण असल्याने तेथे वाहने नेण्यास आणि भरधाव चालवण्यास मनाई असतानाही चालकाने नियमांचे उल्लंघन केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सध्या दापोली पोलीस सदर अज्ञात चालकाचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.