मुंबई- गोवा महामार्गावर धावत्या कारला आग

कार जळून खाक, प्रवासी बचावले

चिपळूण:- मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेंड–चिपळूण दरम्यानच्या एक्सेल फाटा परिसरात आज पहाटे एक भीषण प्रसंग घडला. गोव्याच्या दिशेने जाणारी मारुती एर्टिगा कार अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन डिव्हायडरवर आदळली आणि काही क्षणांतच वाहनाला भीषण आग लागली. पहाटे सुमारे पाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

प्राथमिक तपासात चालकाला डुलकी लागल्याने वाहनावरील ताबा सुटल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर कारच्या पुढील भागातून धूर निघू लागला आणि लगेचच आगीचे लोळ उठू लागले. प्रसंगाची तीव्रता लक्षात येताच कारमधील सर्व प्रवाशांनी तत्काळ बाहेर उडी घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मात्र काहीच मिनिटांत संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. वाहनातील सर्व साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच लोटे एमआयडीसी येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली. तोपर्यंत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

या आगीमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने बंदोबस्त ठेवत वाहतूक सुरळीत केली. पहाटेच्या वेळी डुलकी, वेग आणि दुर्लक्ष यामुळे होणाऱ्या अपघातांचा धोका पुन्हा अधोरेखित झाला असून वाहनचालकांनी प्रवासादरम्यान अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.