रत्नागिरी:- ठाणे येथील सराफ व्यापारी किर्तीकुमार अजयराज कोठारी यांच्या खून प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून जप्त करण्यात आले. कोठारी हे त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानात जात असल्याचे या फुटेजमध्ये दिसत आहे. तसेच दुकानात खून झाल्यानंतर गोणीत भरलेला कोठारी यांचा मृतदेह संशयित आरोपी रिक्षामध्ये भरून नेत असल्याचेही सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. कोठारी यांच्या खून प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज अत्यंत महत्वाचा पुरावा असल्याचे मानले जात आहे.
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्ड करणारी डिव्हीआर मशीनही हस्तगत करण्यात आली आहे. संशयित आरोपी यांना त्रिमूर्ती ज्वेलर्स ते गुहागर तालुक्यातील आबलोली येथल पऱ्या या ठिकाणी नेण्यात आले. यावेळी खुनाच्या घटनेचे प्रात्यक्षिक संशयित आरोपींकडून करून घेण्यात आले. दरम्यान बुधवारी संशयित आरोपींची पोलीस कोठडी समाप्त होत असल्याने पुन्हा त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. यावेळी पोलिसांकडून पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी हे कोठारी यांच्या खुनाचा तपास करत आहेत. मागील ६ दिवसांपासून कोठारी खून प्रकरणाचा कसून तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. खून प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा करण्यात येत आहेत. १९ सप्टेंबर रोजी रत्नागिरीत सोने-चांदीच्या व्यवसायासाठी आलेले किर्तीकुमार कोठारी यांचा शहरातील त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानात दोरीने गळा आवळून खून करण्यात आला होता. आर्थिक व्यवहारातून हा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासामध्ये समोर आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी त्रिमूर्ती ज्वेलर्सचे मालक भूषण सुभाष खेडेकर (४२, रा. खालची आळी रत्नागिरी), रिक्षाचालक महेश मंगलप्रसाद चौगुले (३९, रा. मांडवी सदानंदवाडी रत्नागिरी) व फरीद महामूद होडेकर (३६, रा. भाट्ये खोतवाडी) यांना अटक केली आहे.
किर्तीकुमार कोठारी यांचा खून केल्यानंतर १९ सप्टेंबर रोजी तीनही संशयितांनी मृतदेह एका मोठ्या गोणीमध्ये भरला. यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास महेश चौगुले याच्या रिक्षात हा मृतदेह भरण्यात आला होता. तसेच मृतदेह आबलोलीतील जंगलमय परिसरात असलेल्या पऱ्यामध्ये संशयितांनी मृतदेह फेकून दिला. कोठारी हे रत्नागिरी येथून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचा मुलगा करण याने शहर पोलिसात दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये किर्तीकुमार कोठारी हे दुकानात जाताना दिसले होते. मात्र दुकानातून बाहेर पडताना दिसून आले नाहीत. याच ठिकाणी पोलिसांना काही तरी घातपात झाल्याचा संशय आला. यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास किर्तीकुमार कोठारी यांचा मृतदेह गोणीमध्ये भरून रिक्षामध्ये टाकण्यात आला. यानंतर ही रिक्षा रत्नागिरी शहरातून मजगांव पाटीलवाडीमार्गे गुहागर- आबलोली येथे नेण्यात आली. दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. कोठारी यांच्या खूनप्रकरणाची उकल ही सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून करण्यात आली होती. खून खटल्यात हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरणार असल्याने पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे.