रत्नागिरी:- मुंबईतील प्रसिद्ध सोने – चांदी व्यापारी कीर्ती कोठारी रत्नागिरी बाजारातून गूढरित्या गायब झाले आहेत. रत्नागिरीत व्यापारासाठी आले असताना ते सोमवारी रात्री पासून गायब झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथून व्यवसायिक कामासाठी रत्नागिरीत आलेले सोने चांदीचे व्यापारी कीर्तिकुमार कोठारी( वय 55) हे राधाकृष्ण नाका येथून बेपत्ता झाले आहेत. कीर्तिकुमार हे मीरा भाईंदर येथील असून ते रत्नागिरीत ज्वेलर्सच्या दुकानात आपला सोने चांदीचा माल विकण्यास येतात. नेहमीप्रामाणे ते रत्नागिरीत आले होते. त्यांनी आपला मुक्काम आठवडा बाजार येथील एका लॉजमध्ये केला होता. सोमवारी रात्री ते एम. जी. रोड येथील एका ज्वेलर्सकडून राधाकृष्ण नाक्यापर्यंत चालत आल्याचे सिसिटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मात्र त्यानंतर त्यांचा माग काढता येत नाही. यासाठी बाजारपेठेतील सिसिटीव्ही फुटेज तपासण्याचे काम चालू आहे. त्यांच्याजवळ सुमारे 10 लाखांचे दागिने होते अशी देखील चर्चा आहे.
सोमवारी रात्री नंतर नातेवाईकांचा त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांनी रत्नागिरीतील व्यापाऱ्यांजवळ त्यांचेबाबत विचारणा केली व काल थेट रत्नागिरी गाठली. आता कीर्तिकुमार यांचे नातेवाईक देखील त्यांचा शोध घेत असून पोलिसांना देखील खबर देण्यात आली आहे. कीर्तिकुमार यांचे वास्तव्य ज्या लॉजमध्ये होते तिथे ते सोमवार पासून परत न आल्याचे सांगितले जात आहे. लॉजच्या खोलीत फक्त त्यांचे सामान आहे. आता बाजारपेठेतील सिसिटीव्ही फुटेज तपासून पोलीस या घटनेचा तपास करित आहेत.
लागोपाठच्या घटनांनी खळबळ
सोमवारी रत्नागिरी येथील राम नाक्यात एका व्यवसायिकाला तिघांनी लुटले तर मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शहरातील माळ नाका येथे एका महिलेला लुटाण्यात आले. दिवसाधावळ्या घडलेल्या या लुटीच्या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण असताना आता ही नवीन घटना समोर आली आहे.