रत्नागिरी:- शहरातील डी.एस. भोसले प्लाझासमोर अज्ञात कारणावरुन मिरजोळे येथील तरुणाला लोखंडी राॅडने बेदम मारहाण करणार्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत प्रसाद शिवगण ( ३२, रा. मिरजोळे) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रसाद १६ फेब्रुवारी रोजी रात्री १०.१५ वाजता डी.एस.भोसले प्लाझाजवळ उभा असताना तिथे आलेल्या दोघा व्यक्तींनी त्यांच्याशी हुज्जत घातली. हुज्जत सुरु असतानाच दोघापैकी एकाने त्याच्याकडे असलेल्या लोखंडी राॅडने प्रसाद शिवगण याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रसाद यांनी त्यांना प्रतिकार केला, परंतु एकाने पकडले व एकाने लोखंडी राॅडने मारले. या झटापटीत प्रसाद याच्या उजव्या हाताला लागले. यानंतर प्रसाद याला नागरिकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. यासंदर्भात दोघा अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी दुपारी शहर पोलिसांनी भोसले प्लाझासमोर जाऊन पंचनामा केला. दोघा संशयितांचा शोधण्यासाठी एका पथकाची नियुक्ती केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण करीत आहेत.









