Friday, September 11, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मिरकरवाडा येथे कुत्र्यांशी क्रुर वागणूक; दुचाकीला बांधून नेले फरफटत

मिरकरवाडा येथे कुत्र्यांशी क्रुर वागणूक; दुचाकीला बांधून नेले फरफटत

रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा परिसरात दोन तरुणांनी कुत्र्यांना दुचाकीला बांधून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने नागरिक आणि प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही घटना बुधवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामरान मजगावकर (राहणार मिरकर वाडा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुण कुत्र्यांना दुचाकीला बांधून ओढत नेत असल्याचे दिसत आहे. यावेळी एका महिलेने या तरुणांना जाब विचारत, “कुत्र्यांना अशाप्रकारे फरफटत नेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे,” असे सुनावले. मात्र, संबंधित तरुणांनी महिलेच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी तिच्याशी हुज्जत घालत आरडाओरड आणि शिवीगाळ केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या संतापजनक प्रकाराची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी तत्काळ दखल घेतली असून संबंधित तरुणांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्राणीप्रेमीही पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. मुक्या प्राण्यांवर अशाप्रकारे अमानुष वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्राणीप्रेमींकडून करण्यात येत आहे.