Tuesday, May 19, 2026
spot_img
Home रत्नागिरी मिरकरवाडा बंदरातील नांगरून ठेवलेल्या जुन्या नौका आज बाहेर काढणार

मिरकरवाडा बंदरातील नांगरून ठेवलेल्या जुन्या नौका आज बाहेर काढणार

रत्नागिरी:- रत्‍नागिरीतील मिरकरवाडा बंदरावर काढून ठेवलेल्या जुन्या मोडक्या केबीनसह डिगींवर नोटीस लावून त्‍या तेथून हलवण्याची सूचना करण्यात आली आहे. त्‍याचबरोबर जेटीच्या ठिकाणी जुन्या लाकडी नौका फुटून बुडाल्या आहेत त्‍या मंगळवारी बाहेर काढल्या जाणार असल्याचे मत्‍स्य व्यवसाय विभागाचे सहाययक आयुक्त जे.डी.सावंत यांनी सांगितले.

मिरकरवाडा बंदरावर सहाययक आयुक्तांसह मिरकरवाडा बंदर प्राधिकरणाचे अधिकारी अक्षया मयेकर, परवाना अधिकारी चिम्नय जोशी, सुरक्षा रक्षकांनी पोलीस बंदोबस्तात पाहणी केली. पर्ससीन नेट नौकांची मासेमारी बंद होत आली आहे. सुमारे ९५ टक्के नौका मिरकरवाडा बंदरासह तालुक्यातील इतर जेटींवर शाकारुन ठेवण्यात आल्या आहेत. या नौका समुद्रात मासेमारीसाठी जातात तेव्हा सोबत असलेल्या छोटया नौका बंदरावर काढून ठेवण्यात आल्या आहेत. अनेक नौकांच्या तुटलेल्या केबिनही काढून ठेवण्यात आल्या आहेत. या डिगींसह केबिनवर नोटीस चिकटवून बंदरावरुन हलवण्याची सूचना करण्यात आली आहे. या डिगी आणि केबिनचे मालक निष्पन्न झाले नसल्याने डिगींसह केबिनवर नोटीस लावण्यात आल्या आहेत.

सहाययक मत्‍स्य व्यवसाय आयुक्त जे.डी. सावंत आणि त्‍यांच्या सोबत असलेल्या पथकाने जेटीच्या ठिकाणी समुद्रात बुडलेल्या जुन्या नौकांचीही पाहणी करण्यात आली. या बुडलेल्या नौका मंगळवारी बाहेर काढल्या जाणार असल्याचे सहाययक आयुक्तांनी सांगितले. या बुडालेल्या नौकांमुळे पावसाठी बंदी काळात त्‍या जेटीच्या ठिकाणी कार्यरत नौका उभ्या करता येत नाहीत. या जेटीवर जागा नसल्याने तालुक्याच्या इतर जेटींवर नेवून नौका शाकारुन ठेवाव्या लागतात. याची दखल घेवून मत्‍स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने अपेक्षित कार्यवाही सुरु केली आहे.