Tuesday, October 6, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मिरकरवाडा जेटी येथे मच्छी खरेदीच्या वादातून तरुणावर लोखंडी फाईटने हल्ला

मिरकरवाडा जेटी येथे मच्छी खरेदीच्या वादातून तरुणावर लोखंडी फाईटने हल्ला

दोन संशयितांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- मच्छी खरेदी करण्यासाठी मिरकरवाडा येथे गेलेल्या तरुणाला ‘तू मच्छी खरेदी करण्याची डेअरिंग कशी केलीस?’ असे म्हणत दोघांनी शिवीगाळ करून लोखंडी फायटरने मारहाण केल्याची घटना मिरकरवाडा जेटी येथे घडली. या मारहाणीत तरुणाच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघां संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शफीक महंमद शरीफ दर्वे (वय ४५) आणि अब्दुल्ला शफीक दर्वे (वय २२, दोघे रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना शनिवारी (ता. ३) रात्री साडेआठच्या सुमारास मिरकरवाडा जेटी येथे मच्छी खरेदीच्यावेळी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रज्जाक हमजा साब (वय ४३, व्यवसाय मच्छीमार सप्लायर, रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, शिवाजी नगर, रत्नागिरी) हे शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास मिरकरवाडा जेटी येथे मच्छी खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते जमीर अब्दुल रऊफ होडेकर आणि मोहम्मद मुसेफ मुराद भाटकर यांच्याकडून मच्छी खरेदी करत होते.
यावेळी संशयित शफीक दर्वे आणि अब्दुल्ला दर्वे तेथे आले. त्यांनी फिर्यादीला ‘तुला सांगितले होते ना, तू मिरकरवाडा येथे मच्छी खरेदी करण्याची डेअरिंग कशी केलीस? तुला आता मर्डर करतो,’ असे म्हणत वाद घातला. यानंतर शफिक दर्वे फिर्यादीची गचांडी पकडून त्याला खाली पाडले. त्यानंतर संशयित अब्दुल्ला दर्वे याने हातातील लोखंडी फायटरने फिर्यादीच्या डोक्यात, छातीवर आणि पाठीवर मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या कपाळाला दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला. त्यानंतरही संशयितांना फिर्यादींना धमकी देण्यात आली.

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित साक्षीदार व ग्रामस्थांनी हस्तक्षेप करून फिर्यादीची संशयितांच्या तावडीतून सुटका केली. जखमी रज्जाक साब यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन फिर्यादीचा जबाब नोंदविला. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.