महिला मच्छीमारांमध्ये खळबळ
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरात सध्या सुकी मासळी चोरीच्या घटनांनी मच्छीमार महिलांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणावर मासळी सुकवण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून जेटीच्या बाजूला सुकवण्यासाठी घातलेली हजारो रुपये किमतीची मासळी रातोरात गायब होत असल्याने खळबळ उडाली आहे. नेमकी ही चोरी कोण करत आहे आणि चोरटा कुठला आहे, असा प्रश्न आता या महिलांना पडला आहे.
दररोज रात्रीच्या वेळी मासळी चोरीला जात असल्यामुळे महिला मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या चोरीच्या प्रकारामागे गावातीलच कोणाचा तरी हात असावा, असा संशय स्थानिक महिला व्यक्त करत आहेत. दररोज मेहनतीने सुकवायला घातलेली मासळी चोरीला जात असल्याने महिला आता त्रस्त झाल्या असून, अखेर या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. वारंवार होणाऱ्या या चोरीच्या सत्रामुळे मिरकरवाडा परिसरात सध्या घबराटीचे वातावरण असून पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.









