Tuesday, May 19, 2026
spot_img
Home रत्नागिरी माहेर संस्थेतील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

माहेर संस्थेतील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

जिल्ह्यात खळबळ, पोलिसांकडून ‘शोध पत्रिका’ जारी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याच्या निवळी हातखंबा येथील “माहेर संस्था” या मुलींच्या बालगृहातून १२ जून रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी तातडीने ‘शोध पत्रिका’ जारी केली असून, नागरिकांना मुलींना शोधण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, १५ वर्षीय कु. पुनम अनिल कांबळे आणि १७ वर्षीय कु. प्रीती रवी बनसोडे या दोघी “माहेर संस्था” येथे पालनपोषणार्थ दाखल होत्या. घटनेच्या दिवशी, त्या संस्थेच्या आवारातील नळावर कपडे धुण्यासाठी गेल्या असता, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अल्पवयीन वयाचा गैरफायदा घेऊन संस्थेच्या कायदेशीर रखवालीतून त्यांना पळवून नेले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

या गंभीर प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ११७/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला असून, मुलींना शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

नागरिकांना आवाहन:
वरील नमूद अल्पवयीन मुलींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास, तात्काळ रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देण्यासाठी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२३०१३३ आणि मोबाईल क्रमांक ९३२१२११५१६ उपलब्ध आहेत. आपल्या सहकार्याने या दोन्ही मुलींना लवकरात लवकर सुरक्षित परत आणण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे.