बाप-लेकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा आणि वाडीचे प्रमुख असल्याचा राग मनात धरून एका ५३ वर्षीय व्यक्तीच्या घरात घुसून लोखंडी फरशीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी तालुक्यातील मावळगे येथे घडली आहे. या हिंसक प्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात बाप-लेकाविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मावळगे वरची गुळेकरवाडी येथील रहिवासी विलास बापू वारीसे (वय ५३) हे २७ मे रोजी सकाळी ९:५० वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी एकटेच होते. यावेळी जुन्या वादातून आरोपी अमर शंकर बंडबे हा हातात धारदार लोखंडी फरशी घेऊन त्यांच्या घरात घुसला. ‘माझ्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार का दिलीस, आज तुला संपवणारच’ असे म्हणत त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादी वारीसे यांनी त्याला आदल्या दिवशी केलेल्या शिवीगाळीचा जाब विचारला असता, आरोपी अमर याने हातातील लोखंडी फरशी उगारून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
हा वाद सुरू असतानाच काही वेळात अमरचा मुलगा सर्वेश अमर बंडबे हा देखील हातात धारदार लोखंडी फरशी घेऊन तेथे पोहोचला. ‘तू वाडीचा प्रमुख आहेस, तू संपलास की बाकी सर्वजण बरोबर घाबरतील’ असे म्हणत त्याने वारीसे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तर दुसरीकडे, ‘तू एकाएकाला संपव, मी तुझ्या पाठीशी आहे’ असे म्हणत आरोपी वडिलांनी आपल्या मुलाला चिथावणी दिली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी जखमी फिर्यादी विलास वारीसे यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. २७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता पोलिसांनी दोन्ही आरोपी अमर बंडबे आणि सर्वेश बंडबे यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ३७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता तसेच भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पूर्णगड पोलीस करत आहेत.









