Saturday, July 4, 2026
spot_img
Home रत्नागिरी मालगुंड येथील प्राणी संग्रहालयासाठी ११५ कोटी ४२ लाखांची ई-निविदा

मालगुंड येथील प्राणी संग्रहालयासाठी ११५ कोटी ४२ लाखांची ई-निविदा

रत्नागिरी:- रत्नागिरीकरांसाठी आणि महाराष्ट्रातील पर्यटन प्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. निसर्गरम्य कोकणात आता एका जागतिक दर्जाच्या भव्य प्राणी संग्रहालयाची निर्मिती होणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध मालगुंड येथे ‘मालगुंड प्राणी संग्रहालय’ अंतर्गत विशेष प्रकल्प उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी कामाला अखेर मोठी गती मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या विशेष प्रकल्पाच्या बांधकामासाठी आणि विकासासाठी तब्बल ११५ कोटी ४२ लाख ८७ हजार १५५ रुपयांची ई-निविदा जाहीर केली असून यामुळे रत्नागिरीच्या पर्यटनाला एक नवे आणि आधुनिक वैभव प्राप्त होणार आहे.

उत्तर रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल अ. ओटवणेकर यांच्या वतीने ही निविदा प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. या अवाढव्य प्रकल्पाची रचना अतिशय आधुनिक पद्धतीने करण्यात आली असून यामध्ये १ अब्ज १ कोटी ५३ लाख १३ हजार ६७५ रुपयांचे नागरी बांधकाम आणि १३ कोटी २९ लाख ७८ हजार ४४८ रुपयांची विद्युत कामे केली जाणार आहेत. याशिवाय रॉयल्टी आणि टेस्टिंगसाठी स्वतंत्रपणे ५९ लाख ९५ हजार ३२ रुपये खर्च केले जातील. या संपूर्ण कामासाठी पात्र कंत्राटदारांना ५७ लाख ७२ हजार रुपये इसारा रक्कम म्हणून जमा करावी लागणार आहे, तर परफॉर्मन्स सिक्युरिटी म्हणून १ कोटी १५ लाख ४३ हजार रुपये निश्चित करण्यात आले आहेत. हा ऐतिहासिक प्रकल्प कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून पावसाळ्यासह पुढील २४ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करावा लागणार आहे.
या प्राणी संग्रहालयाचे मुख्य आकर्षण येथे उभारण्यात येणारे भव्य टनेल अ‍ॅक्वेरियम असणार आहे, ज्यामध्ये सागरी जीवसृष्टी दाखवणारे ‘सी वॉटर मरीन कम्युनिटी टनेल अ‍ॅक्वेरियम’ आणि ‘फ्रेशवॉटर मॉन्स्टर टनेल अ‍ॅक्वेरियम’ अशा १ आधुनिक संरचनेचा समावेश असेल. संग्रहालयाच्या सुरक्षेसाठी आणि व्यवस्थापनासाठी येथे ३४ आधुनिक मोटराईज्ड गेट ऑपरेटिंग सिस्टम बसवल्या जातील. या भव्य बांधकामासाठी २६०८.०० क्युबिक मीटर आरसीसी एम-२० आणि त्यावरील दर्जाचे काँक्रीट वापरले जाईल, तर २५१.७५ मेट्रिक टन टीएमटी/एचसीआरएम स्टील आणि २१६.०० मेट्रिक टन स्ट्रक्चरल स्टीलचा वापर केला जाईल. विद्युत कामांतर्गत ३६८ पॉईंट वायरिंग, ३०५०.०० मीटर लांबीची एचटी अल्युमिनियम केबल, ५२५.०० मीटर एचटी कंडक्टर, ६२.५ केव्हीए क्षमतेचे डीजी सेट आणि १०० केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवला जाणार आहे.

या प्रकल्पासाठी इच्छुक कंत्राटदारांना २ जुलै २०२६ (सकाळी १०:०० वाजेपासून) ते २४ जुलै २०२६ (संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत) महाटेंडर्सच्या संकेतस्थळावरून निविदा डाऊनलोड आणि अपलोड करता येतील. या संदर्भातील प्री-बीड मिटिंग ९ जुलै २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता मुख्य अभियंता कार्यालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. मूळ कागदपत्रे व अनामत रक्कम सादर करण्याची अंतिम मुदत २७ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेपर्यंत असून, त्याच दिवशी सकाळी ११:०० ते संध्याकाळी ५:३० वाजेदरम्यान रत्नागिरी येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात तांत्रिक व आर्थिक निविदा उघडल्या जातील. कंत्राटदारांना यासाठी ५,९०० रुपये निविदा शुल्क भरावे लागेल. या भव्य प्रकल्पामुळे मालगुंड परिसराचा कायापालट होणार असून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

असे दिसतील प्राणी पक्षी
या भव्य प्राणी संग्रहालयात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी विविध प्रजातींचे प्राणी व पक्षी आणले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने वाघ, बिबट्या,अस्वल आणि लांडगा यांसारख्या हिंस्र व वन्य श्वापदांसाठी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अद्ययावत व सुरक्षित नैसर्गिक अधिवास तयार केले जात आहेत. शाकाहारी प्राण्यांमध्ये नीलगाय , काळवीट, चितळ आणि सांबर यांसारख्या विविध हरिणांच्या प्रजातींसाठी विस्तीर्ण मोकळी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. याशिवाय, सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी आधुनिक ‘रेप्टाईल हाऊस’ आणि दुर्मिळ व रंगीबेरंगी पक्ष्यांसाठी एक भव्य ‘एव्हिएरी’ देखील उभारण्यात येत आहे, ज्यामुळे पर्यटकांना कोकणातच एकाच छताखाली समृद्ध वन्यजीव सृष्टीचा अनुभव घेता येईल.