शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर सर्कल येथे विराजमान असलेल्या ‘श्री रत्नागिरीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपातून भरदिवसा सुमारे ४० हजार रुपये किमतीचे चांदीचे ताम्हण अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. सत्यनारायण पूजेच्या वेळी मंडपात झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने हातसफाई केल्याचा संशय असून, रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी शंखेश्वर मधुबन, बोर्डिंग रोड, माळनाका येथील अमरेश सुरेश पावसकर (वय ४४) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी सकाळी ‘श्री रत्नागिरीचा राजा’ गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी साडेदहा ते पावणेदहा या कालावधीत गणपतीच्या मूर्तीसामोरील भागात धार्मिक विधी सुरू होते. यावेळी पूजेच्या साहित्यामध्ये सुमारे ४०० ग्रॅम वजनाचे आणि अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे चांदीचे ताम्हण ठेवण्यात आले होते. पूजेसाठी आलेल्या भाविकांची मंडपात मोठी गर्दी होती.
याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कोणाच्याही लक्षात न येता चांदीचे मौल्यवान ताम्हण चोरून नेले. पूजेदरम्यान ताम्हण जागेवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर मंडपात एकच खळबळ उडाली. त्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि भाविकांनी ताम्हणाचा शोध घेतला; मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही.
अमरेश पावसकर यांच्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मंडप परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच चोरीच्या वेळी उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या हालचालींची माहिती पोलिसांकडून तपासली जात असून, चोरट्याचा शोध सुरू आहे.









