संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठ येथे एका फूटवेअर व्यावसायिकाची ऑनलाईन माध्यमातून ३८,००० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माखजन येथील रोहिदासवाडी येथे राहणारे संतोष यशवंत सावर्डेकर (वय ४४ वर्ष) यांचे माखजन बाजारपेठेत फूटवेअरचे दुकान आहे. २५ मे रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान एका अज्ञात आरोपीने त्यांच्या संमतीशिवाय ऑनलाईन पद्धतीने पैशांचे ट्रान्सफर केले.
अज्ञात आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र (शाखा माखजन) येथील जॉईंट अकाऊंटमधून २,००० रुपये काढले. त्यानंतर फिर्यादी यांच्या जनता सहकारी बँक खात्यामधील १२,००० रुपये काढण्यात आले.
तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा माखजन येथील खात्यामधून उर्वरित रक्कम ट्रान्सफर करून घेतली. अशी एकूण ३८,००० रुपयांची रक्कम फिर्यादी यांच्या संमतीशिवाय ऑनलाईन काढून आर्थिक फसवणूक करण्यात आली.
या घटनेची नोंद १९ जून रोजी रात्री ११:२२ वाजता संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४), माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(सी) आणि भा.द.वि.क. ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.









