Friday, September 11, 2026
spot_img
Home खेड मांडवे लघु पाटबंधारे प्रकल्पाचा मार्ग मोकळा

मांडवे लघु पाटबंधारे प्रकल्पाचा मार्ग मोकळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’वर शिक्कामोर्तब

खेड:- खेड तालुक्यातील अनेक दशकांपासून रखडलेल्या न्यू मांडवे लघु पाटबंधारे प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. तब्बल ३२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाच्या व्यय व अग्रक्रम समितीच्या बैठकीत प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास अंतिम मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.

या निर्णयामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रकल्पाला अखेर गती मिळणार असून परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सिंचन व पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाने त्रस्त असलेल्या भागाला या प्रकल्पातून दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे जल फाउंडेशनचे नितीन सखाराम जाधव यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास २६ जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा देत त्यांनी आंदोलन छेडले होते. शासनाच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय स्थगित करण्यात आला होता. १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आल्यानंतर अखेर शासनाने सकारात्मक भूमिका घेतली.

या लढ्यात प्रकल्पग्रस्त शेतकरी, जागामालक तसेच किंजळे, नातू घोगरे, दहिवली आणि शिंगरी या गावांतील ग्रामस्थांनी एकजूट दाखवली. स्थानिक खासदार व विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनीही वेळोवेळी शासनस्तरावर पाठपुरावा केला.

न्यू मांडवे प्रकल्पाला मिळालेली मंजुरी ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून संयम, सातत्य आणि लोकएकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे. प्रकल्प मार्गी लागल्यानंतर परिसरातील शेती उत्पादनवाढ, पाण्याची उपलब्धता आणि ग्रामीण अर्थचक्राला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.